KPD26B13448
धुळे : उपजिल्हाधिकारी शरद पवार यांना निवेदन देतांना शेतकरी संघटनेचे पदाधिकारी.
---------
दुष्काळी उपाययोजनांची तत्काळ अंमलबजावणी करा
धुळे : शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कापडणे, ता. १३ : धुळे जिल्हा हा अवर्षणप्रवण क्षेत्रात येत असल्याने नेहमीच पाणी व चाराटंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. यावर्षी खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून, पावसाच्या दीर्घ खंडामुळे आणि असमान वितरणामुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. शासनाने धुळे जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर केल्याबद्दल आभारी आहोत. आता दुष्काळ निवारण उपाययोजनांची प्रभावी व तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दुष्काळ जाहीर केल्यानंतर शासकीय निकषानुसार महसुलातील सूट, कर्जवसुली स्थगिती, विद्यार्थ्यांचे शुल्क माफ यांची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. जलयुक्त शिवार योजनेची प्रभावी अंमलबजावणी, नाला खोलीकरण, गाळ काढणे, शेततळे व गावतळ्यांची निर्मिती प्राधान्याने हाती घ्यावी. धुळे जिल्हा पोकरा (नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी) योजनेत समाविष्ट नाही. तो तत्काळ समाविष्ट करून ठिबक, तुषार, रेन गन ९० टक्के अनुदानावर द्यावेत, जेणेकरून रब्बी हंगामात पाण्याचा कार्यक्षम वापर होईल. मुख्यमंत्री बळीराजा पाणंद शेत रस्ता योजना ‘रोहयो’च्या कामात समाविष्ट केल्यास शेतमालाची ने- आण सुलभ होईल. शासनाकडून मिळणारी दुष्काळी मदत एकरी ५० हजार तात्काळ द्यावी. त्यातील २५ हजार खरीप हंगामातील भांडवली खर्चाचे परिमार्जन म्हणून व २५ हजार रब्बी हंगामात पेरणीसाठी द्यावे. ज्यांच्याकडे पाण्याची सुविधा आहे. अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ दहा हजार निविष्ठा खरेदीसाठी द्यावेत, खरीप हंगामातील कर्जवसुली पूर्णपणे थांबवून कृषी अवजारे व इतर कर्जाचाही समावेश करावा, पीक विम्याची रक्कम तत्काळ खात्यात जमा करावी. चारा व पाणीटंचाई निवारण उपाययोजनांची तत्काळ अंमलबजावणी करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम देवरे, माजी जिल्हाध्यक्ष गुलाबसिंग रघुवंशी व आत्माराम पाटील, जिल्हा उपाध्यक्ष नारायण माळी, माजी अध्यक्ष शांतूभाई पटेल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
---------