पान चार
-----------
34542
सुट्रेपाडा (ता. धुळे) : शेतीशिवारात जाऊन पिकांच्या सद्यःस्थितीची पाहणी करताना आमदार राम भदाणे. शेजारी पदाधिकारी.
--
सुट्रेपाड्यात जलतारा प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय
आमदार भदाणे यांच्या मार्गदर्शनात पाहणी ; दुष्काळ निवारणावर मंथन
--
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ५ : सुट्रेपाडा (ता. धुळे) येथे दुष्काळ नियोजन तसेच पाणी व चारा व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक पार पडली. बैठकीपूर्वी आमदार राम भदाणे यांनी शेतीशिवारात जाऊन पिकांच्या सद्यःस्थितीची पाहणी केली. नंतर आमदार भदाणे यांच्या मार्गदर्शनात दुष्काळ निवारणासाठी सर्वसमावेशक कृती आराखडा निश्चित झाला. या वेळी परिसरातील तीन प्रमुख समस्यांवर चर्चा झाली.
पाणी आणि वीजपुरवठा विस्कळीत करणाऱ्या फिडरच्या तांत्रिक अडचणींवर बैठकीत चर्चा झाली. संबंधित महावितरणचे अभियंता ठाकूर यांना तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश आमदार भदाणे यांनी दिले. भूजल पातळी खालावल्याने भविष्यातील पाणीटंचाईवर शाश्वत मात करण्यासाठी जलतारा प्रकल्पाच्या कामांना गती देण्याचा निर्णय घेण्यात आला. जास्तीत जास्त शेतांमध्ये जलतारा खड्डे घेण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे ठरले. तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर असल्याने परिसरात गवत व चारा लागवडीला प्रोत्साहन देणे आणि चारा बियाणे उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करण्यात आले.
बैठकीस प्रशासक महंत, ग्रामसेवक ठाकरे, तलाठी आगळे, मंडळ अधिकारी हाके, कृषी अधिकारी भदाणे, पाणीपुरवठा अभियंता फुलपगारे, माजी सरपंच तुळशीदास अहिरे, माजी उपसरपंच मनोज गवते, किरण थोरात, भरत नवसारे, नाना वाघ, नेर मंडळ अध्यक्ष छोटू मासुळे, तालुका अध्यक्ष अशोक सुळके, रावसाहेब शिंदे, बळीराजा पाणंद रस्ते समिती सदस्य किशोर शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सुखदेव पाटील उपस्थित होते.