मेन
विभागातील ३८ तालुक्यातील विद्यार्थ्यांना शुल्क माफी
दुष्काळामुळे मंडळाची घोषणा, शाळांनी शुल्क परत करण्याच्या सूचना
सकाळ वृत्तसेवा
येवला,ता. २८ : दुष्काळ जाहीर झालेल्या नाशिक विभागातील ३८ तालुक्यातील दहावी-बारावीच्या लाखो विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचा दिलासा मिळाला आहे.राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक नाशिक विभागीय शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांकडून शुल्क घेऊ नये आणि घेतले असल्यास ते मुख्याध्यापकांनी परत करावे अशा सक्त सूचना दिल्या आहेत.
नाशिक शिक्षण मंडळाच्या सचिव सरोज जगताप यांनी पत्राद्वारे शुल्क माफीच्या सूचना केल्या आहेत.
दुष्काळामुळे बाधित विभागीय मंडळातील १३ (नाशिक), ४ (धुळे), १५ (जळगाव) आणि नंदुरबार जिल्ह्यातील ६ अशा एकूण ३८ तालुक्यांतील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे फेब्रुवारी-मार्चच्या परीक्षेचे शुल्क माफ झाले आहे.
शासकीय, खाजगी अनुदानित, विनाअनुदानित आणि स्वयं-अर्थसहाय्यित अशा सर्व प्रकारच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना माफी मिळणार आहे. दुसऱ्यांदा परीक्षा देणारे (रिपीटर),बहिःस्थ (एक्सटर्नल),विद्यार्थी शहरात शिकतो पण त्याचे मूळ गाव दुष्काळग्रस्त तालुक्यात असेल किंवा पालकांची शेतजमीन दुष्काळग्रस्त तालुक्यात असेल, तर अशा विद्यार्थ्यांनाही या माफीचा लाभ मिळेल. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्जही शुल्क न घेता भरले जाणार आहे.शाळांच्या मुख्याध्यापकांनी व प्राचार्यांनी पात्र विद्यार्थ्यांची माहिती बोर्डाच्या संकेतस्थळावर दुष्काळग्रस्त नोंद या ऑप्शनमध्ये पुढील ७ दिवसांच्या आत भरणे आवश्यक आहे.
घेतलेले शुल्क परत
आतापर्यत शुल्क माफीचे पत्र नसल्याने जवळपास सर्वच शाळांनी विद्यार्थ्याकडून शुल्क जमा केले आहे.किंवा ज्या शाळा किंवा महाविद्यालयांनी आधीच परीक्षा शुल्क जमा केले आहे पण ते बोर्डाकडे भरलेले नाही, त्यांनी ते शुल्क विद्यार्थ्यांना तात्काळ परत करावे. मंडळाकडे पैसे परत न दिल्याची तक्रार येऊ देऊ नये अशा स्पष्ट सूचना आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी शुल्क थेट बोर्डाकडे भरले आहे, त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात पैसे परत केले जातील.
त्यासाठी मुख्याध्यापकांवर जबाबदारी निश्चित केली आहे.
शुल्क माफीस पात्र तालुके:
नाशिक : मालेगाव, सटाणा (बागलाण), कळवण, नांदगाव, सुरगाणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, येवला, देवळा, त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाड.
- धुळे : धुळे, साक्री, शिंदखेडा व शिरपूर.
- जळगाव : एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर व यावल.
- नंदुरबार : अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, तळोदा व धडगाव (अक्राणी).
कोट
दुष्काळ जाहीर झालेल्या विभागातील सर्व तालुक्यांतील विद्यार्थ्यांना शुल्क माफी जाहीर झाली आहे.दुष्काळग्रस्त तालुक्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्काविना आपले आवेदनपत्र भरावे. शाळांनी अशा विद्यार्थ्यांकडून कोणतीही फी घेऊ नये तसेच घेतलेली फी तातडीने परत करावी.
- सरोज जगताप (सचिव, राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ,नशिक)