फोटो :
कोंढावळ : शिवारात पिकांचे पंचनामा करताना ग्राम महसूल अधिकारी जे. एन. पाटील, ग्रामविकास अधिकारी गोविंद गिरासे, सहायक कृषी अधिकारी श्री. खेडकर, भानुदास माळी, शेतकरी लक्ष्मण भिल.
---
वडाळी परिसरात दुष्काळाचे संकट अधिक गडद
जलपातळी खालावल्याने कापसासह फळ पिकांच्या उत्पादनावर परिणाम
सकाळ वृत्तसेवा
वडाळी, ता. ११ : परिसरात खरीप हंगामात पावसाची सुरुवात उशिराने झाली होती. पाऊस झाल्यावर हवामान व कृषी विभागांचा आवाहनानंतर शेतकऱ्यांनी कापूस, पपई, केळी यांसह अन्य पिकांची लागवड केली. मात्र अनियमित व तुरळक पावसामुळे पिकांची वाढ खुंटली असून, त्याचा उत्पन्नावर परिणाम होत आहे. सध्या परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांमधील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत असल्याने दुष्काळाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे.
या वर्षीदेखील शेतकऱ्यांनी आशेने कापूस, केळी, पपई, मका, मिरची या नगदी पिकांची लागवड केली. बागायत कापसाची लागवड मेच्या शेवटच्या आठवड्यात, तर कोरडवाहू पिकाची लागवड पावसाच्या पाण्यावर करण्यात आली. जूनमध्ये हमखास पडणाऱ्या पावसाने सुरुवातीला पाठ फिरवली. जुलैमध्ये काही भागात पाऊस सक्रिय झाला. मात्र अनेक भागात पावसाची स्थिती असमाधानकारकच राहिली. लागवड केलेल्या पिकांना वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असताना वीजपुरवठा अनियमित होऊ लागला. यातून सावरत पिके जगवली. पिकांची वाढ होऊन फलधारणादेखील झाली; मात्र त्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. प्रत्येक पिकासाठी लागवडीपासून ते काढणीपर्यंत केलेल्या आर्थिक गुंतवणुकीचे गणित बिघडल्याने शेतकऱ्यावर कर्जाचा बोजा वाढणार आहे.
पाणीटंचाई होणार गडद
तुरळक, अल्प पावसामुळे या वर्षी काही भागांतील नदी, नाल्यांना पूर आलाच नाही. ऑक्टोबरमध्ये तापमानांचा पारा ३६ अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. यामुळे लहान धरण, तलाव यामधील जलसाठ्यांचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असून, जंगलात पाण्याचे साठे आटू लागल्याने गुरांना पाण्याची टंचाई आत्तापासूनच जाणवत आहे. त्यासोबतच चाराटंचाईचे सावट निर्माण झाले आहे.
रब्बीची आशा मावळली
सध्या परिसरातील शेतकरी लागवड केलेल्या कापूस, मका, मिरची या पिकाचे हाती आलेले उत्पन्न काढून घेत आहेत. अल्प पाणीसाठा असल्यामुळे रब्बी हंगामाबाबत शेतकरी चिंतीत आहेत. अवकाळी पावसाने हजेरी लावल्यास त्याचा फटका गहू, हरभरा, पपई पिकांना मोठ्या प्रमाणात बसतो. मात्र आता पाऊस तर नाहीच मात्र वाढत्या तापमानामुळे जलपातळी सातत्याने खाली जात आहे. रब्बीची आशा धूसर होताना दिसत आहे.
---
शहादा तालुक्यातील खरिपाचे पीकनिहाय लागवड क्षेत्र (हेक्टरमध्ये)
कापूस - जिरायत, बागायत - ५८, ५००
पपई - ५,३६२
केळी - ६,३५५
मिरची- २,८२२
मका - १०,४४६
सोयाबीन - ६,३६९