NSK26H31781
जळगाव : अमली पदार्थ नष्ट करताना पोलिस अधिकारी व कर्मचारी.
----
दोन गुन्ह्यांतील ६५ कोटी ७० लाखांचे अमली पदार्थ नष्ट
---
ॲम्फेटामाइन व मेथाक्वालोनचा रांजणगाव ‘एमआयडीसी’त नाश; पोलिसांची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ९ : जिल्ह्यातील दोन गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले ४६.१५४ ग्रॅम ॲम्फेटामाइन व मेथाक्वालोन हे अमली पदार्थ पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसीत नियमानुसार नष्ट करण्यात आले. त्यांची किंमत ६५ कोटी ७० लाख रुपये आहे.
पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक संदीप गावित आणि अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
कडेकोट बंदोबस्तात वाहतूक
सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, केंद्र सरकारचे नियम, तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांनुसार जप्त अमली पदार्थांच्या मुद्देमालाचा आढावा घेण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक तथा अमली पदार्थविरोधी पथकाचे नोडल अधिकारी राहुल गायकवाड यांनी केंद्रीय मुद्देमाल कक्षात जमा असलेल्या अमली पदार्थांची माहिती संकलित करून नाशाची प्रक्रिया केली. जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या स्ट्राँग रूममधून शुक्रवारी (ता. ९) मध्यरात्री पंचांच्या उपस्थितीत ‘सील’बंद अवस्थेतील मुद्देमाल बाहेर काढण्यात आला. वजने-मापे निरीक्षक गौतम उत्तम बावस्कर उपस्थित होते. त्यानंतर पोलिस मुख्यालयातील सशस्त्र पोलिस गार्डच्या कडेकोट बंदोबस्तात हा मुद्देमाल पुणे जिल्ह्यातील रांजणगाव ‘एमआयडीसी’त नेण्यात आला.
समितीच्या मान्यतेनंतर नष्ट
सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यावर जिल्हास्तरीय अमली पदार्थ मुद्देमाल नाश समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. समितीने प्रस्तावाची पडताळणी करून मुद्देमाल नष्ट करण्यास मान्यता दिली. नंतर रांजणगाव ‘एमआयडीसी’तील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड येथे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले.
चौकट
समितीच्या उपस्थितीत कारवाई
जिल्हास्तरीय समितीत पोलिस उपअधीक्षक (गृह) संजय गायकवाड, निरीक्षक राहुल गायकवाड आणि वजने-मापे निरीक्षक गौतम बावस्कर यांचा समावेश होता. या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलिस कर्मचारी संदीप पाटील, राहुल बैसाणे, सागर पाटील, उमाकांत पाटील व सशस्त्र पोलिस गार्डचे कर्मचारी सहभागी झाले. शासकीय छायाचित्रकार जयंत चौधरी यांनी नाश प्रक्रियेचे चित्रीकरण केले. पंच म्हणून सुनील विसावे आणि संजय रंधे उपस्थित होते.