फोटो : H32719
भक्तिरंगात रंगला दुर्गापूजेचा सोहळा
बंगाली असोसिएशनच्या दुर्गापूजा महोत्सवाला प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १७ : भक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक उत्साहाचा त्रिवेणी संगम असलेल्या नाशिक बंगाली असोसिएशनच्या दुर्गापूजा महोत्सवाला शुक्रवारी (ता. १६) मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला. महाषष्ठीच्या पूजाविधींनी सुरू झालेल्या या महोत्सवामुळे आनंदवल्ली परिसरात उत्सवी रंगत अवतरली आहे. पुष्पांजली, आमंत्रण, अधिवास, संध्या आरती आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी पहिल्या दिवसाची शोभा वाढवली.
गंगापूर रस्त्यावरील आनंदवल्ली येथे सेरेन मेडोजसमोरील वृंदावन लॉन्समध्ये हा सहादिवसीय सोहळा रंगत आहे. दुर्गामातेच्या आराधनेसोबतच बंगाली संस्कृती, परंपरा आणि कलावैभवाचा अनुभव नाशिककरांना या महोत्सवातून घेता येणार आहे.
शनिवारी (ता. १७) महासप्तमी, रविवारी (ता. १८) महाअष्टमी, सोमवारी (ता. १९) महानवमीशी संबंधित धार्मिक विधी, मंगळवारी (ता. २०) महानवमी, तर बुधवारी (ता. २१) महादशमी साजरी होणार आहे. महाअष्टमीला विशेष पूजेसह संधीपूजेचे आयोजन करण्यात आले आहे. महापूजा, पुष्पांजली आणि संध्या आरतीबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेलही या काळात अनुभवायला मिळेल. महादशमीच्या दिवशी अपराजिता पूजा, सिंदूर उत्सव आणि विजयादशमीच्या पारंपरिक सोहळ्याने महोत्सवाची सांगता होईल. याशिवाय २५ ऑक्टोबरला कोजागरी लक्ष्मीपूजा, तर २५ जानेवारी २०२७ रोजी सरस्वती पूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक बंगाली असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत भट्टाचार्य, उपाध्यक्ष शेखर दत्ता, सरचिटणीस अमिताभ चक्रवर्ती आणि खजिनदार कल्लोल पुरकाईत यांच्यासह आयोजन समितीचे सदस्य महोत्सवाच्या यशस्वी नियोजनासाठी परिश्रम घेत आहेत. नाशिककरांनी कुटुंबीयांसह या भक्तिमय आणि सांस्कृतिक सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.