कीर्तिध्वजाच्या साक्षीने दसरा
------------------------
आदिमाया सप्तशृंगी माता
नऊ दिवसांच्या भक्तिसाधनेनंतर आदिमाया सप्तशृंगी मातेच्या गडावर विजयादशमीला धार्मिक परंपरांचा जागर होणार आहे. शतचंडी यागाची पूर्णाहुती, दसरा टप्प्यावरील पारंपरिक विधी, शिखरावरील कीर्तिध्वजाचे दर्शन आणि महापूजेने नवरात्रोत्सवाची सांगता होईल. लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या गडावर या सोहळ्याला विशेष महत्त्व आहे.
- दिगंबर पाटोळे
आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापनेने सुरू झालेल्या नवरात्रोत्सवात सप्तशृंगगडावर दररोज विविध धार्मिक विधी, पूजा-अर्चा आणि आरती केली जाते. महानवमीच्या दिवशी मंदिराच्या सभामंडपात पुरोहितांच्या मंत्रोच्चारात शतचंडी याग व होमहवनाला प्रारंभ होतो. देवीच्या आराधनेतील या यागाची विजयादशमीला पूर्णाहुती दिली जाते. मंत्रघोष, यज्ञविधी आणि देवीच्या जयघोषाने गडावरील वातावरण भक्तिमय होते. पूर्णाहुतीनंतर मानकरी, ग्रामस्थ आणि उपस्थित प्रतिनिधींच्या सहभागाने भगवतीची आरती केली जाते.
दसरा टप्प्यावरील बोकडबळीची परंपरा
सप्तशृंगगडावरील दसरा उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या पायऱ्यांवरील दसरा टप्प्यावर होणारा पारंपरिक बोकडबळी विधी. या विधीला शेकडो वर्षांची धार्मिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. मात्र, २०१६ मध्ये विधीदरम्यान झालेल्या अपघातानंतर भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने या विधीवर बंदी घातली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० सप्टेंबर २०२२ च्या निर्देशांनुसार प्रशासन, देवस्थान ट्रस्ट आणि संबंधित संस्थेने मान्य केलेल्या कार्यपद्धतीनुसार या विधीस परवानगी मिळाली. पाच वर्षांच्या खंडानंतर ५ ऑक्टोबर २०२२ पासून ही परंपरा पुन्हा सुरू झाली. सध्या न्यायालयीन निर्देश आणि निश्चित कार्यपद्धतीनुसार मोजक्या मानकरी व अधिकृत प्रतिनिधींच्या उपस्थितीत हा विधी पार पडतो.
कीर्तिध्वज दर्शनाचे महत्त्व
विजयादशमीच्या पर्वात सप्तशृंगगडावरील कीर्तिध्वजाला विशेष महत्त्व आहे. दरेगाव येथील गवळी पाटील कुटुंबातील मानकरी मध्यरात्री गडावरील शिखरावर कीर्तिध्वज फडकवतात. दसऱ्याच्या दिवशी गडावरील ग्रामस्थ आणि भाविकांना या ध्वजाचे दर्शन घडते. देवीच्या सामर्थ्याचे, विजयाचे आणि श्रद्धेचे प्रतीक म्हणून या परंपरेकडे पाहिले जाते.
घटविसर्जन आणि नैवेद्याची परंपरा
नवरात्रोत्सवात घटस्थापना करून उपासना करणाऱ्या महिला विजयादशमीच्या दिवशी देवीचे दर्शन घेतात आणि विधिपूर्वक घटविसर्जन करतात. देवीला पूरणपोळी, वरण-भात, भाजी आदी पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो. नैवेद्य आरतीनंतर नऊ दिवसांच्या उपासनेची सांगता होते. महाराष्ट्रासह विविध राज्यांतून आलेले भाविक या धार्मिक सोहळ्यात सहभागी होतात.