SAKAL Impact News : द्वारका चौक अखेर उजळला! वृत्त प्रकाशित होताच पथदीप सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

As soon as the news was published in the morning, the area of ​​Dwarka lit up with electric lights

SAKAL Impact News : द्वारका चौक अखेर उजळला! वृत्त प्रकाशित होताच पथदीप सुरू

जुने नाशिक : राष्ट्रीय महामार्ग 1प्राधिकरण आणि वीज वितरण विभागाच्या वादामुळे संपूर्ण द्वारका परिसर काळोखात सापडला होता. गेल्या दहा दिवसांपासून येथील दोन्ही हायमास्ट आणि उड्डाणपुलावरील पथदीप बंद असल्याने अंधार पसरला होता.

याबाबत ‘सकाळ’मध्ये रविवारी (ता. २६) वृत्त प्रसिद्ध होताच सोमवारी (ता. २७) द्वारका चौकातील दीप सुरू होऊन परिसर उजळला आहे. (Dwarka Chowk finally lights up path lamp starts SAKAL Impact News nashik)

द्वारका परिसरातील दोन्ही हायमास्ट आणि उड्डाणपुलावरील, तसेच चौकातील पथदीप गेल्या दहा दिवसांपासून बंद होते. त्यामुळे परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. वाहतूकदारांसह परिसरातून ये-जा करणाऱ्या सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.

अंधाराची संधी साधत बेकायदेशीर प्रकारही येथे घडत होते. शहराचे मुख्य प्रवेशद्वार अशी ओळख असल्याने द्वारका चौक परिसरात वाहनांची २४ तास वर्दळ असते. अशा महत्त्वपूर्ण भागात काळोख पसरल्याने शहराची प्रतिमा मलिन होत होती.

त्याचबरोबर अपघातास निमंत्रण मिळत होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून ‘सकाळ’ने रविवारी याकडे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत द्वारका चौक येथील हायमास्ट, तसेच रस्त्यावरील आणि उड्डाणपुलावरील पथदीपांचा वीजपुरवठा सोमवारी सुरळीत करण्यात आला.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

त्यामुळे पुन्हा एकदा द्वारका चौक आणि उड्डाणपूल विद्युत रोषणाईने उजळून निघाला. हायमास्ट आणि पथदीप सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. त्यामुळे परिसरात अंधाराची संधी साधत होणाऱ्या बेकायदेशीर प्रकारांना आळा बसण्यास मदत झाली.

यापुढेही सातत्याने अशाच प्रकारे येथील वीजपुरवठा सुरळीत राहावा. जेणेकरून नागरिकांना कुठल्याही अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येणार नाही. याची दक्षता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि वीज वितरण विभागाने घ्यावी, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.