एन्कर
--
फोटो : B07624
ई-छावणी पोर्टल बंद; नागरिकांची गैरसोय
पाणीपट्टी, घरपट्टीसह विविध करांचा ऑनलाइन भरणा ठप्प
सकाळ वृत्तसेवा
देवळाली कॅम्प, ता. १६ : देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे ई- छावणी पोर्टल गेल्या आठवड्यापासून बंद असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या पोर्टलद्वारे स्वीकारली जाणारी पाणीपट्टी, घरपट्टी, जन्म-मृत्यू दाखले तसेच इतर विविध कर व शुल्क भरण्याची ऑनलाइन प्रक्रिया ठप्प झाली आहे. त्यामुळे नागरिकांची महत्त्वाची कामे रखडली असून त्यांना वारंवार कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहेत.
ई-छावणीची साईट दिल्ली येथून बंद असल्याचे सांगितले जात असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, तांत्रिक अडचणींचा फटका सर्वसामान्य नागरिकांना का बसावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या समस्येकडे लक्ष वेधत शिवसेना नेते प्रमोद मोजाड यांनी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडे पर्यायी व्यवस्था तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. पोर्टल सुरू होण्यास विलंब होत असल्यास प्रशासनाने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने चलन तयार करून कर व शुल्क स्वीकारण्याची व्यवस्था करावी. तसेच जन्म-मृत्यू दाखले व इतर आवश्यक सेवांसाठी स्वतंत्र पर्यायी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मोजाड यांनी केली आहे. डिजिटल इंडिया आणि ऑनलाइन सेवा यांचा गाजावाजा होत असताना प्रत्यक्षात पोर्टल बंद पडल्यामुळे नागरिकांना कार्यालयाचे वारंवार चक्कर मारावे लागत आहेत. त्यामुळे प्रशासनाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन ई-छावणी पोर्टल पूर्ववत होईपर्यंत पर्यायी व्यवस्था तातडीने सुरू करावी, अशी मागणी प्रमोद मोजाड यांनी केली आहे.