शिक्षकांसाठी जिल्हा परिषदेत इ-व्हिजिट
‘क्यूआर’द्वारे शिक्षणाधिकाऱ्यांच्या वेळेसह प्रलंबित कामांची नोंदही करता येणार
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२८ : जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी शिक्षकांना थेट सुटी टाकून नाशिकला यावे लागत होते. यापासून त्यांची आता सुटका झाली आहे. त्यांना शिक्षणाधिकाऱ्यांची वेळ आणि प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी थेट मोबाईलवरील ‘क्यूआर’ कोडद्वारे नोंदणी करण्याची सुविधा मिळाली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरु केला. शिक्षक व मुख्याध्यापकांना सेवाविषयक तसेच अन्य प्रशासकीय कामांसाठी जिल्हा परिषद कार्यालय, नाशिक येथे यावे लागते. जिल्ह्याच्या दुर्गम व दूरवरच्या भागांतून प्रवास करून कार्यालयात येताना शिक्षकांचा वेळ, पैसा आणि श्रम खर्च होतो. अनेकदा या कामांसाठी त्यांना रजा घ्यावी लागते. ही बाब लक्षात घेऊन शिक्षकांना आपल्या कार्यस्थळावरूनच प्रशासकीय कार्यालयाशी संपर्क साधता यावा आणि प्रलंबित कामकाजाची माहिती सुलभपणे सादर करता यावी, यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
१६-१
पंचायत समिती स्तरावरील कामेही
पंचायत समिती स्तरावरील शिक्षण विभागाच्या कार्यालयात प्रलंबित असलेल्या कामांची माहितीही या क्यूआर कोडद्वारे नोंदविता येणार आहे. त्यामुळे संबंधित कामांची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी शिक्षकांना वारंवार कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता कमी होण्यास मदत होणार आहे.
…
कोट
सर्व शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापकांनी आपल्या प्रलंबित प्रशासकीय कामकाजासाठी प्रत्यक्ष कार्यालयात येण्यापूर्वी इ-व्हिजिट उपक्रमाचा लाभ घ्यावा.
- सरोज जगताप, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)