MSI26B09810
विखरण : देवरे माध्यमिक विद्यालयात ‘ई- कचरा संकलन व विल्हेवाट’ प्रात्यक्षिक सादर करताना विद्यार्थी.
----------------
निकामी झालेल्या उपकरणांमुळे प्रदूषणाला चालना
डी. बी. भारती : विखरण विद्यालयात ई- कचरा संकलन
सकाळ वृत्तसेवा
म्हसदी, ता. ३१ : आजच्या डिजिटल युगात मोबाईल, संगणक, लॅपटॉप व इतर ई- कचरा कालबाह्य, निकामी झालेल्या या उपकरणांची योग्य विल्हेवाट न लावल्यास त्यातील घातक घटकांमुळे माती, पाणी आणि पर्यावरणाचे प्रदूषण होऊ शकते. त्यामुळे ई- कचऱ्याचे स्वतंत्र संकलन करून त्याची अधिकृत पुनर्प्रक्रिया केंद्रामार्फत योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक असल्याचे मत शिक्षक डी. बी. भारती यांनी व्यक्त केले.
विखरण (ता. नंदुरबार) येथील श्री. आप्पासो. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालयात ‘ई- कचरा संकलन व जबाबदार विल्हेवाट’ हे विशेष अभियान राबविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. उपशिक्षक सी. व्ही. नांद्रे यांनी या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ई- कचऱ्याचे दुष्परिणाम, त्याचे वर्गीकरण, सुरक्षित संकलन, पुनर्वापर, जबाबदार विल्हेवाट याविषयी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक डी. डी. साळुंके यांनी ‘ई-कचरा योग्य ठिकाणी द्या, पर्यावरणाच्या रक्षणात आपला वाटा उचला!’ या संदेशातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जाणीव, सामाजिक जबाबदारी आणि शाश्वत विकासाची मूल्ये रुजविणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश असल्याची माहिती दिली.
या विषयावर प्रश्नमंजुषा कार्यक्रम व निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी ई- कचरा, माऊस, की बोर्ड तसेच निरपयोगी मोबाईल फोन, हेडफोन कुंडीमध्ये टाकून मोहिमेला सुरुवात केली. वाय. डी. बागूल यांनी सूत्रसंचालन केले. ए. एस. बेडसे यांनी आभार मानले. उपशिक्षक एम. डी. नेरकर, डॉ. आर. आर. बागूल, एम. एस. मराठे, एस. एच. गायकवाड, जे. एस. पाटील, एस. जी. पाटील, एच. एम. खैरनार उपस्थित होते.