NSK26H34677
नंदुरबार : ई-कचरा संकलन मोहिमेप्रसंगी उपस्थित प्राचार्य नूतनवर्षा वळवी, उपमुख्याध्यापक विजय पवार, पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा, पर्यवेक्षक मनीष पाडवी आदी.
---
एस. ए. मिशनमध्ये ई-कचरा संकलन उपक्रम
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ९ : शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागांतर्गत इको क्लबस फॉर मिशन लाइफ मोहिमेंतर्गत शहरातील एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात कचरा संकलन उपक्रम’ पार पडला. विद्यार्थी आणि शिक्षकांनी उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या उपक्रमासाठी उपशिक्षणाधिकारी नीलेश लोहकरे यांची उपस्थिती लाभली. प्राचार्य नूतनवर्षा वळवी अध्यक्षस्थानी होत्या. उपमुख्याध्यापक विजय पवार, पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा आणि पर्यवेक्षक मनीष पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियानाची सुरुवात करण्यात आली. शिक्षक गौतम सोनवणे आणि शिक्षिका प्रा. पल्लवी पोळ यांनी विद्यार्थ्यांना ई-कचऱ्याचे फायदे, त्याचे महत्त्व आणि पर्यावरणावर होणाऱ्या घातक दुष्परिणामांविषयी मार्गदर्शन केले. घरातील जुने मोबाईल, खराब झालेले चार्जर, निरुपयोगी वायर्स, की-बोर्ड, माऊस आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे कचऱ्यात न फेकता कशी स्वतंत्रपणे जमा करावीत, याबाबत माहिती देण्यात आली.
प्राचार्य नूतनवर्षा वळवी यांनी सांगितले, की आजच्या डिजिटल युगात इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर कमालीचा वाढला आहे. त्यातून निर्माण होणारा ई-कचरा निसर्गासाठी मोठा धोका ठरत आहे. भविष्यातील पिढीसाठी पर्यावरण निरोगी ठेवण्याकरिता अशा प्रकारच्या संकलन मोहिमा राबविणे अत्यंत गरजेचे आहे. उपशिक्षणाधिकारी नीलेश लोहकरे यांनी ई-कचऱ्याच्या शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या पद्धतींवर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक केले.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि योग्य ई-कचरा व्यवस्थापनाविषयी जनजागृती निर्माण झाली. विद्यार्थ्यांनी जुना व निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक कचरा सुरक्षितपणे संकलित करण्यासाठी पुढाकार घेतला. गौतम सोनवणे व प्रा. पल्लवी पोळ यांनी सूत्रसंचालन केले. मनीष पाडवी यांनी आभार मानले.