धुळे : टुडे पान १ साठी...
--
फोटो क्रमांक : 33952
अजनाळे ( ता. धुळे) : पारधी वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेला अचानक भेटीदरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिक्षणमंत्री दादा भुसे.
--
पारधी वस्ती शाळेच्या मुख्याध्यापकास निलंबनाचे आदेश
--
शिक्षणमंत्र्यांचा दणका; विद्यार्थ्यांची अनुपस्थिती, अधिकाऱ्यांना नोटीसा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २९ : सरकारी शाळांच्या ढासळत्या स्थितीवर चिंता व्यक्त होत असताना शिक्षणमंत्री दादा भुसे यांना जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान याचा प्रत्यक्ष अनुभव आला. अजनाळे (ता. धुळे) येथील पारधी वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेला मंत्री भुसे यांनी अचानक भेट दिली असता तेथील अनागोंदी आणि ढिसाळ कारभार पाहून त्यांनी कठोर भूमिका घेतली. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकास तत्काळ निलंबित करण्याचे आदेश त्यांनी दिले असून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीसा बजावण्याचे निर्देश दिल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
-
गुरुवारी (ता. २९) धुळे महापालिकेत नगरसेवक बंटी खोपडे यांच्या विरोधी पक्षनेते पदाचा पदग्रहण सोहळा होता. या कार्यक्रमासाठी आलेले शिक्षणमंत्री भुसे यांनी पूर्वकल्पना न देता आपला वाहनांचा ताफा अचानक अजनाळे गावाच्या दिशेने वळवला. पारधी वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेला त्यांनी अचानक भेट दिली. तेथील वास्तव पाहून उपस्थित अधिकारीही अवाक झाले. शाळेची पटसंख्या ४० असताना प्रत्यक्षात केवळ सात विद्यार्थी उपस्थित असल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थ्यांना वाटण्यात आलेले गणवेश निकृष्ट दर्जाचे आढळले. तसेच शाळेच्या आवारात घाणीचे साम्राज्य दिसून आले. या सर्व प्रकाराबाबत विचारणा केली असता शाळेचे मुख्याध्यापक किशोर धनजी परदेशी हे गैरहजर असल्याचे आढळले. या सर्व गंभीर बाबींची तात्काळ दखल घेत मंत्री भुसे यांनी मुख्याध्यापक परदेशी यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.
-
अधिकाऱ्यांना नोटीसा
तसेच या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करत प्राथमिक शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कारणे दाखवा नोटीसा बजावण्याचे आदेशही मंत्री भुसे यांनी दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करत प्राथमिक शिक्षण विभागाकडून संबंधित मुख्याध्यापक परदेशी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार करून तो मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी वैभव बाचकर यांनी दिली.
-
मनपा शाळेविषयी समाधान
दरम्यान अजनाळे येथील कारवाईनंतर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी धुळे महापालिकेच्या शाळा क्रमांक २१ या पूर्व प्राथमिक शाळेला देखील भेट दिली. महापौर मायादेवी परदेशी यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. या शाळेची व्यवस्था आणि परिसर पाहून मंत्री भुसे यांनी समाधान व्यक्त केले. पूर्वी मनपाच्या ६५ शाळा होत्या ती संख्या घसरून सध्या केवळ १६ वर आली आहे. यावर चिंता व्यक्त करत मनपा शाळांची संख्या पुन्हा किमान ५० पर्यंत नेऊन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले. यासाठी तत्काळ एक ठोस कृती आराखडा तयार करून तो सादर करावा, अशा सूचना मंत्री भुसे यांनी मनपा आयुक्त नितीन कापडणीस, मनपा शिक्षणाधिकारी दासरवाड यांना दिल्या.