नाशिक- ‘‘विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची जाणीव निर्माण व्हावी, ‘नेशन फर्स्ट’ हा विचार रुजविण्याच्या उद्देशाने इयत्ता पहिलीपासूनच सैनिकी शिक्षणाचे प्राथमिक स्तरावरील प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाईल. माजी सैनिक, क्रीडाशिक्षक, एनसीसी व स्काउट-गाइडचे शिक्षक हे विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षणाचे धडे देतील,’’ अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी रविवारी (ता. १) केली. ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या ‘यिन’ व्यासपीठाद्वारे आयोजित ‘समर युथ समिट २०२५’ या दोन दिवसीय निवासी शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.