esakal | कोरोनाकाळात अंडी व्यवसायाला बरकतीचे दिवस; पोल्ट्री व्यवसातून लाखोंचे उत्पन्न
sakal

बोलून बातमी शोधा

eggs

कोरोनाकाळात अंडी व्यवसायाला बरकतीचे दिवस; पोल्ट्री व्यवसातून लाखोंचे उत्पन्न

sakal_logo
By
भगवान हिरे

साकोरा (जि.नाशिक) : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या विविध रुग्णालयांत हजारो रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान रुग्णांना नाश्‍त्यात अंडी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. ऐन उन्हाळ्यातसुद्धा अंडी व्यवसायाला बरकतीचे दिवस आले आहेत. अंडी पोल्ट्री व्यवसायातून लाखोंचे उत्पन्न मिळत असून, पोल्ट्री व्यवसाय नव्या मोडवर आहे.

पोल्ट्री व्यवसातून लाखोंचे उत्पन्न

आजच्या कोरोनाच्या काळात ऐन उन्हाळ्यात सहा ते आठ रुपयाला अंडे विकले जात आहे. हेच अंडे एप्रिल- मेमध्ये तीन ते चार रुपयाला विकले जात होते. आज त्या अंड्यांची दुपटीने किंमत वाढल्याने पोल्ट्री व्यावसायिक लाखोंचे उत्पन्न घेत आहे. गेल्या वर्षी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे अंडी आणि चिकन व्यवसायावर मंदीचे सावट होते. परंतु, काही दिवसांनंतर चिकन आणि अंड्यांपासून रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे या वर्षी चिकन आणि अंड्यांना तेजी असून, उत्पादकांना फायदा होत आहे.

अंडी खाण्याचे फायदे...

अंडी खाणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. अंड्यामध्ये ‘व्हिटामिन डी’ असते. ते हाडांना बळकटी देण्यास फायदेशीर ठरते. अंडी सर्वोत्तम आणि आरोग्यासाठी उपयुक्त पदार्थांपैकी एक मानली जातात. अंड्यात कॅलरी, प्रथिने, निरोगी चरबी, फोलेट, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी ५, व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी ६ यासारखे पोषक आहेत.

अंड्यांच्या पोल्ट्रीसाठी खर्च...

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी अडीच हजार कोंबड्यांसाठी पोल्ट्री साहित्यासह बांधकाम, पिंजरे, स्वयंचलित पाणी व खाद्याच्या सोयीसाठी साडेबारा लाख ते साडेतेरा लाख रुपये. कोंबडी आणल्यापासून ते पहिले अंडे देईपर्यंत एका कोंबडीची ४०० ते ४२५ रुपये व दोन हजार ५०० कोंबड्यांसाठी दहा लाख ते दहा लाख ६५ हजार रुपये खर्च येतो.

पोल्ट्री व्यवसायातून मिळणारे उत्पन्न

एक कोंबडी ४०० ते ४५० दिवस अंडी देते. सरासरी एक कोंबडी चारशे अंडी देते. जवळजवळ अडीच हजार कोंबड्या दहा लाख अंडी देतात. सरासरी वर्षाला आजच्या भावाने खर्चासह ४० ते ४५ लाख रुपये मिळतात. एका अंड्यासाठी दोन ते अडीच रुपये खर्च येतो. सरासरी वीस ते पंचवीस लाख रुपये खर्च येतो. खर्च वजाजाता दीड वर्षाला सरासरी दहा ते बारा लाख रुपये मिळतात.

लागणारे खाद्य

मका, सोयाबीन डिओसी (सोयाबीन चोथा), डीओआरबी (डी ऑइल राइस ब्रेन), मार्बल (कॅल्शियमसाठी), १७ ते १९ प्रकारची औषधे.

मी एक उच्चशिक्षित पदवीधर असून, अडीच हजार पक्ष्यांच्या अंड्यांचा पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. आज सहा महिन्यांनंतर चांगले उत्पन्न मिळत आहे. पाच हजार पक्षी टाकायचे होते. परंतु, दोन महिने बँकांकडे चकरा मारूनही मला कर्ज मिळाले नाही. घरची सगळी पुंजी वापरून मी हा व्यवसाय सुरू केला. त्यात मला दिवसाला दहा ते बारा हजार रुपये मिळत आहेत. सुशक्षित बेरोजगारांनी या व्यवसायाकडे वळावे, हाच मानस आहे. - महेश आहेर, अध्यक्ष, सराई ॲग्रो ग्रुप