esakal | कोरोना संसर्गामुळे शाकाहारी झाले मांसाहारी!
sakal

बोलून बातमी शोधा

eggs & non-veg

कोरोना संसर्गामुळे शाकाहारी झाले मांसाहारी!

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव, (जि. नाशिक) : कोरोना संसर्गाने राज्यात कहर केला आहे. प्रतिकारशक्ती वाढविणे, आनंदी राहणे, इच्छाशक्ती, नियमित व्यायाम यांसह मास्कचा वापर, सामाजिक अंतर व सातत्याने हात धुणे यामुळे कोरोनापासून बचाव होऊ शकतो. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांना अंडी दिली जातात. असे रुग्ण लवकर बरे होत असल्याने वर्षानुवर्षे शाकाहारी असलेले तसेच मांसाहार वर्ज्य असलेले अनेक शाकाहारी कोरोना प्रादुर्भावामुळे मांसाहारी झाले आहेत. यामुळे ऐन उन्हाळ्यातही अंडी, चिकनची विक्री वाढली असून, दरवाढही झाली आहे. याबरोबरच घरोघरी फळे, खजूर व सुकामेवा दिसू लागला आहे.

कोरोनाबाधितांचे अंडी आणि मांसाहार खाण्याला प्राधान्य.

रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अंडी व मांसाहार चांगला असल्याचे आहारतज्ज्ञ सांगतात. एरवी उन्हाळ्यात अंड्यांची मागणी कमी होते. त्याचा या व्यवसायाला फटका बसतो. या वेळी मात्र उन्हाळ्यातही अंड्यांची मागणी कायम असल्याचे अंडी विक्रेत्यांनी सांगितले. शहरात मुळातच अंडी विक्री जोमाने होते. पूर्व भागातील शेकडो अंडाभुर्जीच्या गाड्यांच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळाला. येथील अंडाभुर्जीचे विविध प्रकारही प्रसिद्ध आहेत. प्रामुख्याने कोरोनाबाधित रुग्ण अंडी उकडून खाणे, चिकन सूप, चिकन याबरोबरच डाळी, दूध, कडधान्य, मटण आदी पदार्थांना प्राधान्य देतात. घरोघरी काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड याबरोबरच खजूर वापरले जात आहेत. ड्रायफ्रुटची विक्री वाढल्याचे सुभाष स्टोअर्सचे सुभाष ब्राह्मणकर यांनी सांगितले.

कोरोनाने बदलले अनेकांचे जीवनमान.

पूर्व भागात प्रामुख्याने मांसाहारावर भर दिला जातो. पश्‍चिम भागाच्या तुलनेत पूर्व भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्याने शहरासह तालुक्यात चिकन, अंडीवर भर देतानाच शाकाहारींना त्यांचे मित्र, नातेवाईक व आप्तेष्ट मांसाहार करण्याचा सल्ला देत आहेत. अनेकांनी हा सल्ला मानला असला तरी मांसाहारापासून दूर राहण्याचा दृढ निश्‍चय केलेल्यांनी प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी डाळी, कडधान्य याबरोबरच शेवगा सूप व हळदीचे दूध यावर भर दिला आहे. एकूणच कोरोनाने अनेकांचे जीवनमान बदलले आहे. तसेच यापूर्वी असंख्य आजारांना, अपघातांना तोंड दिलेल्या व शाकाहारी असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांनी मांसाहाराचा मार्ग पत्करला आहे.

मागणी वाढल्याने भावही वधारले.

* अंडी ७५ ते ९० रुपये डझन

* गावराण अंडी १०० ते ११० रुपये डझन

* चिकनचा दर सव्वादोनशे ते अडीचशे रुपये किलो

* गावराण चिकन ५४० रुपये किलो

* बोकडाचे मटण ५८० रुपये किलो

कोरोना काळात तसेच कोरोनाबाधित रुग्णांना प्रथिने (प्रोटिन्सयुक्त) पदार्थ मिळाल्यास त्यांची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मदत होते. चिकन, अंडी या माध्यमातून प्रथिने उपलब्ध होतात. हळद व तत्सम पदार्थ ॲन्टिबॉयटिक्सचे काम करतात. यामुळे प्रामुख्याने अंडी, चिकन खाणे फायदेशीर ठरते. असंख्य रुग्ण कोरोनातून बरे झाल्यानंतर हळदीचे दूध घेतात. प्रमाणात प्रोटिन्सयुक्त पदार्थ लाभदायी ठरतात.

- डॉ. हितेश महाले, वैद्यकीय अधिकारी, सामान्य रुग्णालय, मालेगाव