टूडे कॉमन (एकनाथ शिंदे फोटो घ्यावा)
------------
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आज नाशिकच्या दौऱ्यावर
दुष्काळग्रस्तांना शिधा वाटप, कुंभमेळा आढावा बैठक
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २५- राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे सोमवारी (ता. २६) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन, संत-महंतांशी संवाद, आदिवासी भागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शिधा वाटप, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा व गंगापूर रोड समांतर रस्ते कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे सकाळी ९.३० वाजता त्र्यंबकेश्वर येथे मंदिरात दर्शन घेऊन संत-महंतांशी चर्चा करणार आहेत. श्री चंद्र लॉन्स, त्र्यंबकेश्वर येथे संवाद साधतील. हरसूल येथील महानुभाव दत्त मंदिर, दलपतपूर रोड येथे दुपारी १२ वाजता शिवसेनेच्या वतीने आदिवासी भागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शिधा वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे दुष्काळी परिस्थितीचा आढावा आणि आगामी नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसंदर्भात बैठक होणार आहे. या बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनिषा खत्री उपस्थित राहतील. यावेळी कुंभमेळा कामांचा आढावा घेतील.
-------------
समांतर गंगापूर रोड कामाचा शुभारंभ
नाशिक शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नवीन समांतर गंगापूर रोड भूमिपूजन सोहळा दुपारी ३ वाजता सुरुवात होणार आहे. कॅनॉल रोड परिसर, तिरुमला हाइट्स, पाईप लाइन रोड, गंगापूर रोड येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
---------------
मविप्र वसतिगृहाचे उद्घाटन
दुपारी चारला उदोजी मराठा बोर्डिंग कॅम्पस, गंगापूर रोड येथे कर्मवीर अँड. बाबूराव गणपत ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, आमदार सुहास कांदे, उपमहापौर विलास शिंदे, यांच्या समवेत शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती उपनेते, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली.
-----------------