धुळे : टुडे पान १ साठी..
--
फोटो क्रमांक : 33513, 33514
धुळे : कोजागरी पौर्णिमेच्या औचित्याने एकवीरादेवी मंदिरात श्री भगवतीस अर्पण करण्यात आलेले ५६ भोग नैवद्य. दुसऱ्या छायाचित्रात दर्शनासाठी व पूजेसाठी उसळलेली भाविकांची गर्दी. (छायाचित्रे : गोरख गर्दे)
--
एकवीरादेवी मंदिरात कोजागरीने नवरात्रोत्सवाची सांगता
--
पालखी सोहळा; ५६ भोग अन् महाप्रसादाचे वाटप, भक्तिमय वातावरण
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २५ : खानदेश कुलस्वामिनी एकवीरादेवी व रेणुकामाता मंदिर ट्रस्टतर्फे रविवारी (ता. २५) एकवीरादेवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची भक्तिभावपूर्ण वातावरणात सांगता झाली. कोजागरी पौर्णिमेचे औचित्य साधून मंदिर परिसरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष पर्वावर शहर व परिसरातील हजारो भाविकांनी श्री भगवतीची मनोभावे आराधना करत दर्शनाचा लाभ घेतला.
-
कोजागरी पौर्णिमेनिमित्त रविवारी सकाळी मंदिरात धार्मिक विधींना सुरुवात झाली. सकाळी विधिवत पूजा, पाठ व अभिषेक पार पडला. नंतर आठला भगवतीची आरती झाली. दुपारी बाराला नैवेद्य दाखवून महाआरती करण्यात आली. या महाआरतीनंतर मंदिर परिसरातून भगवतीचा पालखी सोहळा आणि शंखतीर्थ काढण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात निघालेल्या या पालखी सोहळ्यात भाविकांनी सहभाग घेतला. भक्तांनी पालखीचे दर्शन घेऊन देवीच्या चरणी श्रद्धा व्यक्त केली.
-
५६ भोग अर्पण
दुपारी एकला यजमान व मान्यवरांच्या हस्ते अन्नदान तसेच महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मंदिर ट्रस्टच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती, ज्याचा भाविकांनी लाभ घेतला. सायंकाळी गोरज मुहूर्तावर भगवतीस ५६ भोग अर्पण करण्यात आले. रात्री आठला जुने धुळे येथील शनि मारुती भजनी मंडळ यांचा भजनाचा विशेष कार्यक्रम पार पडला. भक्तांनी रात्री उशिरापर्यंत देवीच्या नामस्मरणात व जागरणात सहभाग नोंदवला. या संपूर्ण शारदीय नवरात्रौत्सव व कोजागरी पौर्णिमा महोत्सवाचे मुख्य विश्वस्त सोमनाथ निंबा गुरव व ट्रस्ट मंडळाच्या सर्व सदस्यांनी संयोजन केले. दरम्यान, महोत्सवानंतर सोमवारी (ता. २६) दुपारी बाराला आरतीनंतर ५६ भोग नैवेद्याचा प्रसाद मंदिरात भाविकांना वाटप करण्यात येणार आहे. या प्रसाद भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य विश्वस्त गुरव यांनी केले.