धुळे : टुडे पान १ साठी.. अँकर
--
फोटो क्रमांक : 32910, 32911
धुळे : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त आकर्षक सजावटीने सजलेली श्री एकवीरा देवीची मूर्ती. दुसऱ्या छायाचित्रात अष्टमीनिमित्त मंदिरात दर्शनासाठी उसळलेली भाविकांची अलोट गर्दी. ( छायाचित्रे : गोरख गर्दे )
--
अष्टमीला एकवीरा देवीच्या दर्शनासाठी गर्दीचा उच्चांक
--
भाविकांची अलोट गर्दी : मंदिर २४ तास खुले, सुरक्षेसाठी विशेष नियोजन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १८ : खानदेशची कुलस्वामिनी श्री एकवीरा देवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त रविवारी (ता. १८) अष्टमीनिमित्त भाविकांच्या गर्दीचा उच्चांक पाहायला मिळाला. उत्तर महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्य प्रदेशातून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाल्याने मंदिर परिसरात भाविकांची अलोट गर्दी उसळली होती. या उत्साहामुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कमालीचे भक्तिमय व चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे.
भाविकांना सुलभतेने दर्शन घेता यावे यासाठी नवरात्रोत्सवाच्या काळात मंदिर भाविकांसाठी २४ तास खुले ठेवण्यात आले असून, पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. देवीच्या दर्शनासोबतच धार्मिक विधी, पूजा-अर्चा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत.
-
विविध धार्मिक कार्यक्रम
कुलस्वामिनी एकवीरा देवी मंदिरात घटस्थापनेपासून सुरू असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. यात रविवारी अष्टमीनिमित्त भाविकांच्या गर्दीचा उच्चांक पाहायला मिळाला असून, या वेळी होमहवन आणि शतचंडी यज्ञाची पूर्णाहुती देखील पार पडली. मंगळवारी (ता. २०) महानवमीनिमित्त सकाळी दहाला सुवासिनी पूजन होणार असून त्याच दिवशी सायंकाळी विजयादशमी आणि सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होणार आहे. तर २५ ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दुपारी बाराला महाआरती, पालखी सोहळा आणि शक्तीतीर्थ कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी देवीला ५६ भोगाचा नैवेद्य अर्पण करण्यात येईल, तर रात्री आठला संगीत जागरणाचा कार्यक्रम होणार आहे.
-
सुरक्षिततेची काळजी
नवरात्रोत्सवासाठी मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, बंदिस्त दूरचित्रवाणी यंत्रणा, पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा रक्षकांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना सुलभतेने दर्शन घेता यावे, तसेच उत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडावा, यासाठी मंदिर प्रशासनाकडून पूर्ण काळजी घेण्यात येत आहे. मंदिर संस्थानाचे विश्वस्त, सर्व पदाधिकारी नियोजनासाठी प्रयत्नशील आहेत.
-
परिसराला यात्रेचे स्वरूप
नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात पूजासाहित्य, खाद्यपदार्थ, शीतपेये, खेळणी, संसारोपयोगी वस्तू आणि सौंदर्यप्रसाधनांची दुकाने थाटण्यात आली आहेत. लहान मुलांसाठी पाळणेही दाखल झाल्याने परिसरात उत्सवाची रंगत वाढली आहे. शहरात ठिकठिकाणी गरबा आणि दांडिया रास रंगत असून, घरोघरी अखंड दीप प्रज्वलित ठेवून भक्ती, उत्साह आणि चैतन्याचे वातावरण अनुभवायला मिळत आहे.