ॲंकर
पंचवीस हजार लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित
कळवण तालुक्यात ई केवायसी करण्याचे आवाहान
कळवण ता.२७
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील अनुदानित धान्याचा लाभ सुरू ठेवण्यासाठी शिधापत्रिकेतील प्रत्येक सदस्याची ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. कळवण तालुक्यात अद्याप २५ हजार ११३ लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित असून, संबंधित लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याची गरज आहे.
शिधापत्रिकेतील लाभार्थ्यांची ओळख निश्चित करण्यासाठी ई-केवायसी करण्यात येत आहे. पडताळणी अपूर्ण राहिल्यास अनुदानित धान्याच्या लाभात अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने लाभार्थ्यांनी विलंब टाळावा. रास्त भाव दुकानांमध्ये ई-पॉस यंत्राद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करता येते.
वृद्ध, आजारी तसेच कामानिमित्त बाहेरगावी असलेल्या लाभार्थ्यांना रास्त भाव दुकानात प्रत्यक्ष जाणे शक्य होत नाही. अशा लाभार्थ्यांसाठी ‘मेरा ई-केवायसी’ ॲपच्या माध्यमातून मोबाईलवर घरबसल्या पडताळणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. चेहरा पडताळणी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लाभार्थ्यांना स्वतःची ई-केवायसी पूर्ण करता येते.
चौकट
घरबसल्या ई-केवायसी
लाभार्थ्यांनी मोबाईलमध्ये ‘मेरा ई-केवायसी’ ॲप डाउनलोड करून शिधापत्रिका व आधार क्रमांकासंबंधी आवश्यक माहिती नोंदवावी. त्यानंतर ॲपमधील सूचनांनुसार चेहरा पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करावी. पडताळणी यशस्वी झाल्यानंतर ई-केवायसीची नोंद डिजिटल प्रणालीत केली जाते. मोबाईलवर प्रक्रिया पूर्ण करताना अडचण आल्यास संबंधित रास्त भाव दुकानाशी संपर्क साधून ई-केवायसी करून घेता येईल. कुटुंबातील एकाही पात्र सदस्याची पडताळणी प्रलंबित राहणार नाही, याची शिधापत्रिकाधारकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
चौकट
आकडे बोलतात...
कएकूण लाभार्थी — १,६२,२२९
ई - केवायसी पूर्ण — १,३७,११६
बाकी — २५,११३
कोट-
"कळवण तालुक्यात २५ हजार ११३ लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे. संबंधित लाभार्थ्यांनी आपल्या रास्त भाव दुकानात जाऊन किंवा ''मेरा ई-केवायसी'' अॅपच्या माध्यमातून ही प्रक्रिया लवकर पूर्ण करावी. अनुदानित धान्याचा लाभ मिळण्यात अडचण येऊ नये, यासाठी शिधापत्रिकेतील प्रत्येक सदस्याची ई-केवायसी पूर्ण केल्याची खात्री करावी."
विशाल धुमाळ (पुरवठा अधिकारी, कळवण)