तोतया पोलिसांकडून वृद्ध दाम्पत्यास गंडा
पुढे खून झाल्याचे सांगून दागिने उतरवले अन् दोघे पसार
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.१४ : स्वतःला पोलिस असल्याचे भासवून दोघांनी म्हसावद रेल्वेगेट ते पाथरी दरम्यान वयोवद्ध दाम्पत्यास गाठले. पुढे खून झाला आहे, तुम्ही दागिने काढून ठेवा, असे सांगत दाम्पत्याच्या अंगावरील ९० हजारांचे दागिने काढून घेत दोघे पसार झाले. ही घटना बुधवारी (ता. १३) घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेल्वे विभागातून निवृत्त झालेले वसंतराव सीताराम पाटील (वय ६७, रा. म्हसावद, ता. जळगाव) हे दुचाकीने पत्नीसह पाथरी येथे जात होते. त्या वेळी म्हसावद रेल्वे गेटच्या पुढे गेल्यानंतर दोन जणांनी त्यांना थांबवले व आम्ही पोलिस असल्याचे सांगितले. पुढे दागिन्यांसाठी पती-पत्नीचा खून झाला असून तुम्ही तुमचे दागिने काढून ठेवा. त्यानुसार त्यांनी पाटील यांच्याजवळील रुमाल घेऊन त्यांना त्यात दागिने ठेवण्यास सांगितले. महिलेने दीड तोळ्याची मंगलपोत, ५ ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स, ५ ग्रॅमची अंगठी रुमालात ठेवली.
चौकट
दागिने गायब
या तोतया पोलिसांनी रुमालातील दागिने हातचलाखीने काढून घेत फक्त रुमाल दाम्पत्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवला. काही अंतरावर गेल्यानंतर महिलेला शंका आल्याने दागिने पाहिले असता रुमालात दागिने गायब होते. या प्रकरणी वसंतराव पाटील यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक ईश्वर लोखंडे तपास करीत आहेत.