CSG26B02989
चाळीसगाव : ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करताना रोटरी क्लबचे अध्यक्ष शालिग्राम निकम.
----------------------
चाळीसगावात ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान
--------
रोटरी क्लब ऑफ मिल्कसिटी संगम अन्क वी कट्टा परिवारचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
चाळीसगाव, ता. ३ : ज्या घराच्या उंबरठ्यावर बसलेली ज्येष्ठ मंडळी हसताना दिसली, की ते घर श्रीमंत समजावे. आईवडिलांना वृद्धाश्रमात न पाठविता आपल्या कुटूंबातच त्यांचे समायोजन करावे, असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ मिल्कसिटी संगमचे अध्यक्ष शालिग्राम निकम यांनी केले.
येथील रोटरी क्लब ऑफ मिल्कसिटी संगम व कवीकट्टा परिवारातर्फे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त नुकताच सन्मान सोहळा झाला, त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणूनन श्री. निकम बोलत होते. यावेळी शहरातील ११ ज्येष्ठ नागरिकांचा शाल, भेटवस्तू व बुके देऊन नुकताच सन्मान करण्यात आला. सन्मानीत करण्यात आलेल्यांत मु. रा. अमृतकर, कुसूम पाठक, आरती पुर्णपात्रे, श्रीराम देशपांडे, सोमनाथ सराफ, डॉ. स्मिता अरकडी, आशा कुळकर्णी, नामदेव चौधरी, सुभाष मांडे, बन्सीलाल परदेशी, सीताराम पाटील, किसन परदेशी यांचा समावेश आहे. कवी रमेश पोतदार यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांच्यावर सुंदरसे गायन करून हृदयस्पर्शी कविता ऐकवल्या. दुसऱ्याच्या जीवनात आनंद व चैतन्य निर्माण करण्याचा संकल्पही केला. प्रसंगी परिवारातील सर्वांना चॉकलेट वाटल्या. या आगळा वेगळा उपक्रमाचे ज्येष्ठ नागरिकांनी कौतुक केले.
श्री. निकम पुढे म्हणाले की, ‘दोघांत तिसरा डोळ्यात कचरा’ ही संस्कृती वाढत चालली आहे. त्यामुळे कुटुंबसंस्था मोडकळीस निघाली आहे. एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे जाणूया अन् आपणसुद्धा म्हातारे होणार, याची जाणीव ठेवून त्यांचा सांभाळ करण्याचा संस्कार कुटूंबात पेरूया. ज्येष्ठांच्या जीवनात सुखद व आशेचा रंग भरूया, असेही श्री. निकम यांनी सांगितले.