धुळे : टुडे पान २ साठी...मेन
--
ई-वाहनांचा फोटो किंवा क्लिप घेणे....
दीड महिन्यात साडेपाच हजार वाहने रस्त्यावर
--
दसरा, दिवाळीचा अनुकूल काळ; वाहन बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण
--
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १९ : दसरा, दिवाळीचा अनुकूल काळ साधला गेल्याने यंदा जिल्ह्याच्या वाहन बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या पहिल्या १६ दिवसांत प्रादेशिक परिवहन कार्यालयात पाच हजार ६०२ नव्या वाहनांची नोंदणी झाली. यात चार हजार ३०० दुचाकी आणि ६०७ कारचा समावेश असून, ग्राहकांकडून ई-वाहनांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. सणासुदीमुळे वाहन बाजारपेठेत मोठी उलाढाल होऊन विक्रेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
-
नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळीच्या उत्सवी काळात वाहन खरेदीचा वेग कायम राहिला. वाहन कंपन्यांच्या फेस्टिव्हल ऑफर्स, आकर्षक फायनान्स योजना, कमी व्याजदर आणि दिवाळी बोनस यामुळे ग्राहकांची खरेदीक्षमता वाढली. परिणामी शहरातील विविध वाहन शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी दिसून आली. यातील ९० टक्के चारचाकी वाहनांची खरेदी फायनान्सवर झाली असून, चांगला सिबिल स्कोअर असलेल्या ग्राहकांनी अवघ्या दहा टक्के किंवा दीड ते दोन लाखांच्या डाउन पेमेंटवर नव्या कार खरेदी केल्या. सणासुदीला नवीन वाहन घरी आणण्याची परंपरा यंदाही जपली गेली. अनेक लोकप्रिय मॉडेलचा तुटवडा असल्याने बुकिंग केलेल्या ग्राहकांना किमान आठ ते दहा दिवसांनी गाडी मिळणार आहे. त्यामुळे नोंदणीचा आकडा आणखी वाढणार आहे. ग्रामीण भागातही शेतीकामासाठी २७३ ट्रॅक्टर आणि ४५ कृषी ट्रेलरची खरेदी झाली. तसेच दिवाळीच्या मुहूर्तावर आधीच बुकिंग केलेल्या ग्राहकांनी आनंदात नव्या गाड्यांची डिलिव्हरी घेतली, तर काही ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
-
ई-वाहनांकडे कल
वाढता इंधन खर्च आणि चार्जिंग स्टेशनची वाढती उपलब्धता यामुळे पर्यावरणपूरक ई-वाहनांच्या विक्रीत २० ते ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. दीड महिन्यात ७५८ ई-वाहनांची नोंदणी झाली. यात ऑक्टोबरमध्ये ५३६ वाहने, तर नोव्हेंबरमध्ये २२२ वाहनांचा समावेश आहे. ऑक्टोबरमधील ई-वाहनांमध्ये ५०२ दुचाकी, २० कार, नऊ मालवाहू वाहने, दोन मालवाहू तीनचाकी आणि तीन प्रवासी तीनचाकी वाहने आहेत. नोव्हेंबरमधील ई-वाहनांमध्ये १९५ दुचाकी, १५ कार, आठ मालवाहू वाहने आणि चार मालवाहू तीनचाकी वाहने नोंदवली गेली आहेत. इंधन बचतीमुळे घरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठी ई-वाहनांना पसंती मिळत आहे. यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिक विजेवर चालणाऱ्या दुचाकी आणि चारचाकींकडे अधिक आकर्षित होत आहेत.
-
१४-१
.. चौकट ..
१४-१
दीड महिन्यातील वाहन नोंदणी
मोटारसायकल/स्कूटर ------------------------- ४,२६८
मोटार कार ----------------------------------- ६०७
मालवाहू वाहने -------------------------------- ३०२
कृषी ट्रॅक्टर ------------------------------------२७३
कृषी ट्रेलर ------------------------------------- ४५
मोपेड ----------------------------------------- ३०
मालवाहू तीनचाकी ------------------------------ १७
मोटार कॅब ------------------------------------- १३
जेसीबी----------------------------------------- १०
इतर वाहने ------------------------------------- ३७
एकूण नोंदणी ---------------------------------- ५,६०२