वीजचोरीचा दंड कमी करण्यासाठी
स्वीकारली सात लाखांची लाच
---
चांदवडचा खासगी इलेक्ट्रिकल ठेकेदार ताब्यात
सकाळ वृत्तसेवा
चांदवड, ता. १३ : वीजचोरीच्या प्रकरणात दंडाची रक्कम कमी करून देण्याचे आमिष दाखवत सात लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या चांदवड तालुक्यातील खासगी इलेक्ट्रिकल ठेकेदाराला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी (ता. ५) रंगेहाथ पकडले. शिवाजी खंडेराव शिंदे (वय ४८, रा. वाहेगाव, ता. चांदवड) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
नाशिक रोड येथील बिटको पॉइंटजवळ विद्युत भवनाच्या कार्यालयाबाहेर ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार (वय ५९, व्यवसाय व्यापार) यांच्या शेतात ‘पीपी बॉयलर’ या नावाने पर्यावरण नियंत्रण प्रणालीचा (एन्व्हायर्नमेंट कंट्रोल सिस्टिम) पोल्ट्री फार्म आहे. ३ नोव्हेंबरला नाशिक येथील विद्युत भवनच्या भरारी पथकाने या पोल्ट्री फार्मवरील वीजजोडणीची तपासणी केली होती. या वेळी वीजमीटरमध्ये दोन केबल दिसत असल्याने मीटरव्यतिरिक्त अतिरिक्त विजेचा वापर होत असल्याचा आक्षेप घेण्यात आला.
या प्रकरणात पाच लाख रुपये दंड आणि तीन लाख रुपये रोख, अशी एकूण आठ लाख रुपयांची मागणी झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर संबंधित खासगी व्यक्तीने तक्रारदाराशी संपर्क साधून दंडाची रक्कम कमी करून देण्याच्या मोबदल्यात पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे.
सात लाखांची मागणी निश्चित
या प्रकाराबाबत तक्रारदाराने ४ नोव्हेंबरला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पंचांसमक्ष करण्यात आलेल्या पडताळणीत शिवाजी शिंदे याने भरारी पथकातील संबंधित अधिकाऱ्यांकडून दंडाची रक्कम कमी करून देण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती सात लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर ५ नोव्हेंबरला विद्युत भवनाबाहेर सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून पंचांसमक्ष सात लाख रुपयांची रक्कम स्वीकारताच ‘एसीबी’च्या पथकाने शिंदे याला ताब्यात घेतले.
या प्रकरणी नाशिकमधील उपनगर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७-अ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली. पोलिस निरीक्षक सुवर्णा हांडोरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.