सोमेश्वर कॉलनीत ५० लाखांची वीजचोरी उघड

सोमेश्वर कॉलनीत ५० लाखांची वीजचोरी उघड
Published on: 
सोमेश्वर कॉलनीत ५० लाखांची वीजचोरी भरारी पथकाची धडक कारवाई ; दोघांवर गुन्हा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २८ : सातपूर परिसरातील सोमेश्वर कॉलनी येथे प्लॅस्टिक मोल्डिंग आणि ट्रॉली बॅगचे साहित्य तयार करणाऱ्या कंपनीत महावितरणच्या भरारी पथकाने छापा मारून ५० लाख ३० हजार ३९० रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली आहे. इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये काळ्या रंगाचे छुपे ‘टर्मिनल डिव्हाईस’ जोडून, त्याला हेव्ही मॅग्नेट लावून वीज वापर कमी दर्शविला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात कंपनीच्या मालकासह वापरकर्त्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. महावितरणच्या वाशी (नवी मुंबई) येथील भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुशीलकुमार चंद्रकांतजी जयस्वाल (५४, रा. वाशी) यांच्या फिर्यादीनुसार, भरारी पथकाचे जयस्वाल यांच्यासह सहाय्यक अभियंता कपिल गाठले, कनिष्ठ अभियंता प्रशांत कराळे व तंत्रज्ञांच्या पथकाने घटनास्थळी अचानक भेट देऊन पाहणी केली. भाड्याने दिलेल्या दोन कंपन्यांचा ९६ एचपीपेक्षा जास्त मोठा औद्योगिक वीजभार चालू असल्याचे दिसून आले. मीटरची चाचणी केली असता, वीजमीटर तब्बल ९६.६७ टक्के मंद गतीने चालत असल्याचे उघड झाले. मीटरच्या अंतर्गत भागातील टर्मिनल्सला सोल्डरिंग करून काळ्या रंगाचे फ्लेक्सिबल वायर व विशेष ‘टर्मिनल डिव्हाईस’ जोडलेले आढळले. या डिव्हाईसला बाहेरून हेव्ही मॅग्नेट (लोहचुंबक) लावून करंटची नोंद रोखली जात होती. ऑक्टोबर २०२५ ते सप्टेंबर २०२६ या १२ महिन्यांच्या कालावधीत २ लाख ३९ हजार ३७९ युनिट्सची ५० लाख ३० हजार ३९० रुपयांची वीजचोरी केल्याचे समोर आले आहे. याशिवाय महावितरणने १७ लाख रुपयांची तडजोड रक्कम आकारली आहे. या घटनेचे व्हिडिओ शूटिंग व फोटोग्राफी करण्यात आली आहे. याप्रकरणी अनधिकृतपणे वापरलेली व जोडलेली जोडणी व उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी कंपनी मालक व वीजग्राहक गीता विकास तिडके (६२, रा. सोमेश्वर कॉलनी, सातपूर), वापरकर्ते अविनाश पांडुरंग काळे (४२, रा. तिडके मळा, सातपूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक नागलोत हे तपास करीत आहेत.
Marathi News Esakal
www.esakal.com