NSK26H32887
कुऱ्हे पानाचे (ता. भुसावळ) ः व्याख्यानात बोलताना प्रा. विमल वाणी. शेजारी मान्यवर.
अखेरच्या क्षणापर्यंत माणुसकी जोपासा
प्रा. विमल वाणी ः कुऱ्हे पानाचे येथे व्याख्यानाला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १८ ः लोभ, मोह आणि माया सोडून माणसाने स्वतःमधील अहंकाराचा त्याग करावा. सर्वांवर प्रेम करावे, माणुसकी जपावी आणि आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत माणुसकीचा झरा वाहू द्यावा. देवाचे नामस्मरण करा आणि निरोगी आयुष्य जगा. नव्या पिढीतील मुलांना त्यांनी विचारल्याशिवाय सल्ला देण्याचा आग्रह धरू नका. कारण सुंदर आयुष्य जगण्यासाठी केवळ वय नव्हे, तर सकारात्मक विचार आणि समाधानी मन महत्त्वाचे असते, असा हृदयस्पर्शी संदेश प्रसिद्ध संत साहित्यिक, कथाकार, लेखिका, कवयित्री तथा कादंबरीकार प्रा. विमल वाणी यांनी दिला.
कुऱ्हे पानाचे (ता. भुसावळ) येथील स्नेहबंध ज्येष्ठ नागरिक संस्था व विरंगुळा केंद्रातर्फे आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. ‘स्नेहबंध’चे अध्यक्ष डॉ. टी. टी. बारी अध्यक्षस्थानी होते. आपल्या ओघवत्या, रसाळ वाणीतून संतांचे विचार, जीवनमूल्ये आणि निरोगी आयुष्याचे महत्त्व उलगडताना त्यांनी उपस्थितांच्या हृदयाला स्पर्श केला. सुरवातीला त्यांनी स्वरचित ‘धनी आता वेगळे राहू...’ आणि ‘भोळा तू माणसा...’ या भारुडांसह विविध गीतांचे सादरीकरण केले. ज्येष्ठ नागरिकांना एकत्र आणून त्यांच्या जीवनात आनंद, उत्साह आणि सकारात्मकता निर्माण करण्यासाठी स्नेहबंध संस्था व विरंगुळा केंद्र राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे प्रा. वाणी यांनी कौतुक केले. ज्येष्ठांना संवाद, विरंगुळा आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी असे व्यासपीठ मिळणे ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्ष डॉ. बारी म्हणाले, की आयुष्याच्या उत्तरार्धात माणसाला सर्वाधिक गरज असते ती प्रेमाची, संवादाची आणि मानसिक समाधानाची. ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य आनंदी व उत्साही राहावे, हाच स्नेहबंध संस्थेच्या विविध उपक्रमांमागील उद्देश आहे. सेवानिवृत्त ग्रंथपाल सुदर्शन बडगुजर यांनी सूत्रसंचालन तर सचिव संदीप बारी यांनी आभार मानले. सेवानिवृत्त शिक्षिका आशा गागोदेकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य समाधान पवार, रामदास कोतवाल, रवींद्र गांधेले, आत्माराम धांडे, शरद पाटील, नवल पाटील, सुनील बारी, संजय पाटील आदी उपस्थित होते.
-----------------------