NSK26H33300, NSK26H33301
जळगाव ः संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत झालेल्या आढावा बैठकीत बोलताना सीईओ करिश्मा नायर. शेजारी कार्यकारी अधिकारी राहुल जाधव. दुसऱ्या छायाचित्रात बैठकीस उपस्थित कंत्राटदार व अभियंते.
---
पूर्ण पाणी योजना तातडीने पूर्ण करा
(उपशीर्षक)
सीईओ करिश्मा नायर : जिल्हा परिषदेत आढावा बैठक
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २२ : यंदा पाऊस कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती आहे. पाणीटंचाईचे सावटही आहे. अनेक पाणीपुरवठा योजना अपूर्ण आहेत. प्रामुख्याने जलजीवन मिशनच्या योजनांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधी मिळत नसल्याने योजना अपूर्णावस्थेत आहेत. संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी अपूर्ण पाणी योजना तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी कंत्राटदार व अभियंत्यांना केले.
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, जिल्ह्यातील अपूर्ण पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या झालेल्या आढवा बैठकीत अध्यक्षास्थानावरून त्या बोलत होत्या. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल जाधव, पाणीपुरवठा योजनांचे जिल्ह्यातील कंत्राटदार व संबंधित अभियंता उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील अपूर्ण पाणी योजनांच्या कामांचा आढावा घेण्यात आला.
निधी आल्यास तातडीने देणार
संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत आणि पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होण्यासाठी योजनांची कामे पूर्ण करणे आवश्यक आहे. अपूर्ण योजनांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी कंत्राटदार, संबंधित अधिकारी व अभियंत्यांनी परस्पर समन्वय राखून काम करावे. दहा- २० टक्के काम बाकी असलेल्या योजना पूर्ण करा. शासनाकडून जसा निधी येईल, तसा निधी दिला जाईल. कामकाजातील अडचणी दूर करून योजनांची अंमलबजावणी गतिमान करावी, असे आवाहन सीईओ नायर यांनी केले.
यंत्रणेने जबाबदारीने काम करा
संभाव्य पाणीटंचाईचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक नियोजन करणे गरजेचे असून, पाणी योजनांची कामे वेळेत पूर्ण झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळेल. त्यामुळे संबंधित यंत्रणेने जबाबदारीने पाणीपुरवठा योजनांच्या पूर्ततेला प्राधान्य द्यावे, असे निर्देश या वेळी देण्यात आले.