धुळे : टुडे पान २ साठी..
---
संवादातून जपा भावनिक आरोग्य ः प्रा. पाटील
मानसिक आरोग्य दिनानिमित्त विद्यावर्धिनी महाविद्यालयात उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ११ : संवादाचा अभाव माणसाला एकाकीपणाकडे ढकलत आहे. डिजिटल युगात भौतिक सुविधा वाढल्या असल्या तरी माणसांशी जोडलेले राहणे आणि मनमोकळ्या गप्पा मारणे, हाच खरा भावनिक निवारा आहे, असे प्रतिपादन मानसशास्त्रज्ञ प्रा. वैशाली पाटील यांनी केले.
येथील विद्यावर्धिनी महाविद्यालयात कौन्सिलिंग कमिटीच्या वतीने जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ‘गप्पांचं कौन्सिलिंग’ कार्यक्रम झाला. याप्रसंगी प्रा. पाटील मार्गदर्शन करत होत्या. प्राचार्य डॉ. जगदीश पाटील यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम झाला. प्रा. महेंद्र वाघ, प्रा. बळिराम शिंदे, प्रा. दिनेश भंडारकर, प्रा. दिनेश कुवर उपस्थित होते.
प्रा. पाटील म्हणाल्या, की आज गप्पा मारण्यासाठी भाड्याने माणसे मिळण्याच्या जाहिराती वाचून तरुण भरकटत आहेत. ज्यांचा चेहरा व भावना माहीत नाहीत, अशा अनोळखी व्यक्तींकडे मन मोकळे केले जात आहे. कुटुंबव्यवस्थेत एकत्र बसून आनंद घेणारी माणसे आता केवळ जुन्या छायाचित्रांमध्येच दिसतात. करिअर आणि भौतिक सुखांच्या मागे धावताना घराचे कब्रस्तान करून पैशांचा दीपोत्सव काय कामाचा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गप्पा मारल्याने मिळणारी सकारात्मक ऊर्जा आयुष्याला उभारी देते. किती काळ टीव्हीचा रिमोट किंवा पाळीव प्राण्यांशी बोलणार, दारात आलेल्या माणसाचे स्वागत करून गप्पा मारणे, हेच खरे माणूसपण आहे. काम थोडे उद्यावर ठेवून चार जिवंत माणसांना भेटणे हेच खरे ऐश्वर्य आहे, असे आवाहन त्यांनी केले. प्रा. वैशाली बोरसे यांनी सूत्रसंचालन केले.