लोगो : आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन विशेष
(या फिचरसाठी ग्रामीण महिलांच्या प्रगतीच्या संदर्भात एआय चित्र वापरावे)
शीर्षक
ग्रामविकासाच्या वाटेवर महिलांची समर्थ पावले
स्वयंसहायता गटांपासून मिनी मंत्रालयापर्यत रणरागिणींचा वाढता सहभाग
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या पुढाकारातून गावाच्या प्रगतीला नवी दिशा मिळत आहे. आज अनेक कर्तृत्ववान महिला सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, आध्यात्मिक क्षेत्रासह राजकारणात उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत. समाजाच्या उन्नतीसह या महिलांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळतानाच त्यांनी समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी या रणरागिणी पुढे सरसावल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिनानिमित्त त्यांच्या जिद्दीचा, संघर्षाचा आणि यशाचा प्रवास अनेक ग्रामीण महिलांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
NSK26H32324 शीतल पाटील
कर्जमुक्त महिला समृद्धी
शीतल शैलेंद्र पाटील (दहिगाव, ता. यावल) : दहिगाव येथील शीतल पाटील या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अविरत परिश्रम घेत आहेत. दहिगाव साकळी गणात एकूण ८५ महिला बचत गट कार्यरत आहेत. शीतल यांच्या प्रयत्नांतून येथे ग्राम समृद्धी, सुवर्णक्रांती कार्यालय आणि महिलांची छोटी बँक समजल्या जाणाऱ्या एकता महिला प्रभाग संघाची स्थापना झाली आहे. या प्रभाग संघाच्या माध्यमातून परिसरात तब्बल तीन कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले असून, एकट्या दहिगावात अडीच कोटींचे वितरण झाले आहे. या कर्जामुळे अनेक महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करून समृद्धीच्या मार्गावर आहेत. विशेष म्हणजे या कर्जाची वसुली शंभर टक्के नियमित आहे.
------
BSW26B12163 : वैशाली चोपडे
शेतकरी विकास बचत गटातून भरारी
वैशाली किरण चोपडे (अध्यक्षा, मातृभूमी महिला शेतकरी विकास बचत गट, साकरी, ता. भुसावळ) : साकरी येथील वैशाली किरण चोपडे या ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणाचे एक उत्तम उदाहरण आहेत. ''मातृभूमी महिला शेतकरी विकास बचत गटा''च्या अध्यक्षा असणाऱ्या वैशालीताईंचा दिवस पहाटे चारला सुरू होतो. घरची सर्व कामे आटोपून त्या सकाळी साडेसातपर्यंत शेतात पोहोचतात. आपल्या दिव्यांग पतीला शेतीच्या कामात खंबीर साथ देत, त्या स्वतः शेतात मजुरांसोबत राबतात. त्या केवळ शेतीच करत नाहीत, तर शेतातील दोन गायींची देखभाल आणि पेरू, चिकू, आंबा, सीताफळ अशा विविध फळझाडांचे संगोपनही मनापासून करतात. त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून पाच वर्षे यशस्वीपणे दूध डेअरी देखील चालवली. घर आणि शेती अशी दुहेरी जबाबदारी लिलया सांभाळत आहेत.
----
NSK26H32351 : दुर्गाताई मराठे
कथा, कीर्तनांतून जनजागृती
दुर्गाताई मराठे (दुर्गाताई संतोष मराठे महाराज, संत मुक्ताई फड, मुक्ताईनगर) : आपल्या अमृत वाणीतून अध्यात्मासोबतच विविध सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकून दुर्गाताई समाजात जनजागृती करत आहेत. त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यात तब्बल ३ हजारांपेक्षा अधिक कीर्तन व कथा सेवा दिल्या आहेत. अध्यात्म, संतपरंपरा आणि आदिशक्ती संत मुक्ताईच्या महात्म्याबरोबरच स्त्रीमुक्ती, स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंध, स्त्रीशिक्षण, हुंडाबळी निर्मूलन, बालसंस्कार, कुपोषण निवारण आणि भारतीय श्रेष्ठ संस्कृती यांसारख्या संवेदनशील व महत्त्वाच्या सामाजिक विषयांवर त्या आपल्या कीर्तनातून प्रभावीपणे प्रबोधन करतात. श्रीमद् भागवत कथावाचक म्हणूनही त्या विशेष प्रसिद्ध आहेत. मुक्ताईनगर शहरातील त्या एकमेव महिला कीर्तनकार आहेत.
-----
RVR26B05125 (रंजना पाटील)
जिल्ह्याच्या राजकारणात ठसा
रंजना प्रल्हाद पाटील (मोरगाव, ता. रावेर, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद, जळगाव) : रावेर तालुक्यातील मोरगाव सारख्या छोट्याशा गावातून येऊनही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी रंजना प्रल्हाद पाटील यांना त्यांच्या पक्षनिष्ठेमुळे मिळाली. त्यांचे पती प्रल्हाद पाटील हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते. त्यांच्यासोबतच पक्षकार्यात सातत्य असल्याने पक्षाने आधी त्यांना २०१७ मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत तिकीट दिले आणि विजयी झाल्यावर २०१९ मध्ये अध्यक्ष पदाची संधी दिली. या कार्यकाळात जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या विकास कामांसोबत त्यांनी आपल्या मोरगाव मध्ये जवळपास ८० टक्के भागात काँक्रिटीकरण पूर्ण केले आहे. परिसरातील नदी नाल्यात अधिकाधिक ठिकाणी भिंती बांधून ''पाणी आडवा - पाणी जिरवा'' हा उपक्रम राबवला व परिसरातील भूगर्भातील पाणी पातळी उंचावण्यासाठी प्रयत्न केला आहे.
----------
NSK26H32346 (विमलबाई हिवाळे)
शैक्षणिक संस्कारांतून मुलांना घडवले
विमलबाई रामकृष्ण हिवाळे (पिंपळगाव हरेश्वर, ता. पाचोरा) ः येथील विमलबाई हिवाळे यांचे वय अवघे ३७ असताना त्यांना वैधव्य प्राप्त झाले. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करीत त्यांनी प्रचंड धैर्यशीलतेने आपल्या चारही मुलांचा सांभाळ केला. एका मुलीचा विवाह करून अपंग मुलाला तहसीलदार पदापर्यंत पोहोचवले. विमलबाईंनी शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन आपला एकुलता एक मुलगा मुकेश यांना डी. एड.चे शिक्षण देण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले. शिक्षणाने माणसाच्या जीवनमानात बदल होतो, हीच शिकवण आपल्या चारही मुलांना दिली. मुकेश हिवाळे यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करून तहसीलदार पदापर्यंत मजल मारली. मुकेश यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी विमलबाईंनी शेतीची जबाबदारी स्वतः स्वीकारली. शेतात राबराब राबून कष्ट करून मुलांना शिक्षित केले, याचा त्यांना अभिमान वाटतो.
---------------
NSK26H32355 (वंदना महाजन)
गृहिणी ते यशस्वी उद्योजिका
वंदना उमेश महाजन (उद्योजिका, पाचोरा) ः जिद्द, चिकाटी व वेगळे काही करून दाखवण्याचा आत्मविश्वास असेल तर त्यात गरीबी अथवा स्त्रीपण आडवे येत नाही, याची प्रचिती येथील सत्यशाम प्रॉडक्टच्या ‘सीएमडी’ वंदना महाजन यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. सामान्य गृहिणी ते यशस्वी उद्योजिकापर्यंतची त्यांची वाटचाल प्रेरणादायी ठरली आहे. सामान्य शेतकरी आसाराम महाजन यांच्या कन्या व मेडीकल व्यावसायिक उमेश महाजन यांच्या पत्नी असलेल्या वंदना यांनी मुक्त विद्यापीठाची पदवी संपादन केली आहे. शरीराचे पोषण चांगले असेल तर आजार व औषधांपासून दूर राहता येते, या विचारातून त्यांनी सत्यशाम प्रॉडक्ट हे न्यूट्रिशन व एनर्जी ड्रिंकचे उत्पादन सुरू केले. या माध्यमातून त्या महिलांमध्ये आरोग्य विषयक जागृतता वाढवत असतात. विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमही त्या राबवतात.
--------------
NSK26H32361 (आशा भोई)
मुलाच्या शिक्षणासाठीच धडपड
आशा मन्सारास भोई (भाजीपाला विक्रेता, चाळीसगाव) ः काहीही करुन आपला मुलगा चांगला शिकून सवरून मोठा झाला पाहिजे, यासाठी कष्ट करणाऱ्या आशा भोई यांची धडपड त्यांच्या कर्तृत्वाची ओळख करुन देणारी ठरली आहे. दहा बाय दहाच्या खोलीत राहणाऱ्या आशा भोई या पहाटे चारला उठतात. घरातील सर्व कामे आटोपून बाजारातून भाजीपाला विकत घेतात. शहरातील रस्त्याच्या कडेला दिवसभर उन्हात तो विकून घरी रात्रीचा पुन्हा सर्वांचा स्वयंपाक करायचा. या दिनचर्येत त्यांनी मुलगा वैभवला काहीही कमी पडू दिले नाही. त्यामुळेच वैभव दहावीच्या बोर्डात चाळीसगाव तालुक्यातून पहिला आला. आपला मुलगा डॉक्टर व्हावा, हे आशाबाई व त्यांच्या पतीचे स्वप्न आहे. मुलाला डॉक्टर करण्याची आशाबाईंची जिद्द त्यांच्या जगण्याला जणू नवी दिशा देत आहे.
-------------
POL26B15744 (शैला रणधीर)
व्यसनमुक्तीसाठी झटण्याचा ध्यास
शैला के. रणधीर (अध्यक्षा ः श्री क्षेत्र शिवशक्ती बहुउद्देशीय संस्था, बहादरपूर, ता. पारोळा) ः शिवभक्त आचार्य के. बी. रणधीर यांच्या श्री क्षेत्र शिवशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा शैला के. रणधीर यांचे सामाजिक कार्य आदर्शवत ठरले आहे. व्यसन ही समाजाला लागलेली कीड आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी व्यसनमुक्तीच्या कार्यात स्वतःला झोकून दिले आहे. संस्थेच्या माध्यमातून रक्तदान शिबिरासह विविध आजारांबाबतची मोफत शिबिरे घेऊन त्यांनी विविध व्यसनांमुळे होणारे दुष्परिणाम व त्यापासून होणाऱ्या हानीबाबत जनजागृती करण्याचे काम आजही सुरु ठेवले आहे. शैला रणधीर यांनी या कार्यासोबतच संस्थेतर्फे ग्राम स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड, वीज वाचवा- पाणी वाचवा यासारखे अनेक उपक्रम राबवू न आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवला आहे. आचार्य के. बी. रणधीर यांना सोबत घेऊन त्या व्यसनमुक्तीचे कार्य विनामूल्य व निःस्वार्थपणे गेल्या ४०-४५ वर्षांपासून करीत आहेत.
------------------