धुळे : टुडे पान १ साठी..
--
फोटो क्रमांक : 31463
धुळे : आदिवासी महिला बचतगट मेळाव्यात महिलांनी तयार केलेल्या वस्तू आणि उत्पादनांच्या दालनाला भेट देत पाहणी करताना काशीराम पावरा, मंजुळा गावित, चैत्राम पवार, भाग्यश्री विसपुते, डॉ. रवींद्र सोनवणे, प्रमोद पाटील आदी.
--
वीरांगना राणी दुर्गावती जयंतीनिमित्त धुळ्यात मेळावा
--
महिला बचत गटांना दहा लाखांचा निधी वितरीत; योजनांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ५ : शासकीय योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा आणि आदिवासी महिलांच्या कर्तृत्वाला अर्थबळ लाभावे, या उद्देशाने येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने विशेष महिला बचत गट मेळावा पार पडला. वीरांगना राणी दुर्गावती यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या या कार्यक्रमात महिला सक्षमीकरण, स्वयंरोजगार आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाचा संगम पाहायला मिळाला. कार्यक्रमात सेवा संकल्प अभियानांतर्गत १०० आदिवासी महिला बचत गटांना प्रत्येकी दहा हजार रुपयांप्रमाणे १० लाखांचा निधी वितरित करण्यात आला. तसेच, २०२५-२६ च्या न्यूक्लिअस बजेटमधून ३० पात्र लाभार्थ्यांना ३५ लाखांच्या लाभांचे वाटप करण्यात आले. महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी विविध व्यवसायाभिमुख योजनांची माहितीही या वेळी देण्यात आली.
-
कार्यक्रमास शिरपूरचे आमदार काशीराम पावरा, साक्रीच्या आमदार मंजुळा गावित, पद्मश्री चैत्राम पवार, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र सोनवणे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, सहायक प्रकल्प अधिकारी पवन सोनुने यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी, महिला उपस्थित होत्या.
-
मेळाव्यात आदिवासी भागातील गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी शासकीय व अनुदानित आश्रमशाळांतील दहावी व बारावी परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना राणी दुर्गावती गुणवंत प्रोत्साहनपर बक्षीस योजनेअंतर्गत पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. महिलांच्या रोजगाराची दारे व्यापक करण्यासाठी राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेतून वैयक्तिक व्यवसायासाठी प्रत्येकी ५० हजार तर सामूहिक व्यवसायासाठी सात लाख ५० हजारांचे विशेष अर्थसहाय्य दिले जाणार आहे. तसेच बोटॅनिकल गार्डन व शेतमाल प्रक्रिया अंतर्गत सौर वाळवणी संचासाठी डाबरीमाळा (वाडी बु., ता. शिरपूर) महिला बचत गटाला पाच लाख ५० हजारांचे १०० टक्के अनुदान मंजूर झाले. शिवणकाम प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना शिलाई मशीनसाठी नऊ हजार ९५० रुपये आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून मोटार मेकॅनिकचे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना गॅरेज व्यवसायासाठी ५० हजारांचे अर्थसहाय्य जाहीर करण्यात आले. कार्यक्रमस्थळी शासकीय विभागांनी आणि महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या दालनांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.