चांदोरी- ‘मी आज जे काही आहे, ते शाळेने दिलेल्या संस्कारांमुळेच!’ या कृतज्ञतेच्या भावनेतून उद्योजक मंगेश वडजे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तीन वर्षांत तब्बल एक कोटी २५ लाख रुपयांची देणगी दिली. त्यांच्या या कार्यामुळे समाजासाठी काहीतरी करण्याची ओढ असणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयात नवी उमेद निर्माण झाली आहे. दिंडोरी तालुक्यातील आंबेवणी येथे जन्मलेले मंगेश वडजे लहानपणापासूनच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांनी प्रेरित होते. वडील दत्तात्रय व आई शोभा रयत शिक्षण संस्थेत कार्यरत असल्याने शिक्षण कोळपेवाडी, तसेच चांदोरी येथील शाळेत झाले.