Nashik News | ब्रह्मगिरीचे उत्खनन, गोदेतील बांधकामे रोखू : भुजबळांच्या लक्षवेधीवर शिंदेंची ग्वाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Eknath Shind & Chhagan Bhujbal

Nashik News | ब्रह्मगिरीचे उत्खनन, गोदेतील बांधकामे रोखू : भुजबळांच्या लक्षवेधीवर शिंदेंची ग्वाही

नागपूर (जि. नाशिक) : पर्यावरणाचा समतोल बिघडणार नाही, ऱ्हास होणार नाही यासाठी सरकार पूर्णपणे काळजी घेईल. त्र्यंबकेश्वर येथील उत्खनन व बांधकाबाबत नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अहवाल प्राप्त होताच योग्य ती कारवाई केली जाईल. कुठल्याही प्रकारे बेकायदेशीर बांधकाम होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधिमंडळात दिली. (Excavation of Brahmagiri stop construction in Godavari river Shinde testimony on Bhujbal attention Nashik News)

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ब्रह्मगिरी पर्वताचे उत्खनन आणि नदी पात्रातील अवैध बांधकामाविषयी लक्षवेधीद्वारे केलेल्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. त्र्यंबकेश्‍वर येथील प्रश्‍नांबाबत आमदार हिरामण खोसकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावरील चर्चेत श्री. भुजबळ हे सहभागी झाले होते.

ते म्हणाले, की गोदावरीचे उगमस्थान, भाविकांचे श्रद्धास्थान असलेला ब्रम्हगिरी पर्वत पोखरून मोठ्याप्रमाणात उत्खनन सुरु असून जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. पशू-पक्षाचे स्थलांतर होत आहे. उत्खननामुळे पर्वताच्या कडा कोसळून त्र्यंबकेश्वर शहराला धोका निर्माण होणार आहे. त्र्यंबकेश्वर परिसरातील ब्रम्हगिरी संरक्षणासाठी कस्तुरीरंगन समितीच्या अहवालानुसार पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र जाहीर करून परिसरातील जैव संपदेचे जतन करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.

त्र्यंबकेश्वर परिसरातील मनमोहक वातारणात व सृष्टीसौंदर्याला या उत्खननामुळे बाधा निर्माण झाल्यामुळे पर्यटनावर विपरित परिणाम होणार आहे. त्र्यंबकेश्वर येथील नदी पात्रात सुरु असलेली बेकायदेशीर बांधकामे आणि अवैध उत्खननामुळे तसेच नदी पात्रात सुरु असलेली बेकायदेशीर बांधकामे आणि अवैध उत्खननामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर येथील ब्रम्हगिरी पर्वताचे उत्खनन आणि नदी पात्रातील अवैध बांधकामे तातडीने थांबविण्याबाबत शासनाने कारवाई करावी अशी मागणी श्री. भुजबळ यांनी केली.

आकाशवाणीचे स्थलांतरण नाही

मुंबई आकाशवाणीच्या मराठी प्रादेशिक वृत्तविभागाचे कार्यालय महाराष्ट्रातून स्थलांतर केले जाऊ नये, अशी मागणी श्री. भुजबळ यांची स्थगन प्रस्तावाद्वारे विधानसभेत केली. श्री. भुजबळ यांनी मांडलेला प्रश्न हा गंभीर असून सरकार त्याचा गांभीर्याने विचार करेल आणि हे कार्यालय स्थलांतरीत होऊ दिले जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. श्री. भुजबळ म्हणाले, की देशातील आकाशवाणीच्या चारशेहून अधिक केंद्रात वेगळा ठसा उमटवलेले आणि अनेकदा सर्वोत्कृष्ट केंद्र म्हणून गौरवलेल्या मुंबई आकाशवाणीच्या मराठी प्रादेशिक वृत्तविभाग मुंबईतून स्थलांतरीत केला जात आहे.

सीमाप्रश्नावर महाराष्ट्राला खुले आव्हान दिले जात असताना महाराष्ट्राचे सरकार गप्प असल्याने आकाशवाणी मराठीसाठी सरकार काही करेल की नाही? याबाबत नागरिकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. प्रादेशिक विभागातील वृत्तसंपादक आणि उपसंचालक ही दोन्ही पदे यापूर्वी कोलकोत्ता आणि श्रीनगरला हलवण्यात आली आहेत.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

हेही वाचा: Nashik News : पुना रोडवरील खड्ड्याने घेतला महिलेचा बळी; रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर!

वक्तव्याबद्दल भुजबळांचे स्पष्टीकरण

पुरवणी मागण्यांवर बोलताना मुंबईच्या प्रश्नांबाबत श्री. भुजबळ यांनी ‘पूर्वी असे म्हणत असत की, मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे', असे वक्तव्य केले होते. त्यावर काही सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. मात्र हे वक्तव्य चुकीचे नाही आणि जे वक्तव्य म्हणून इतिवृत्तात घ्यावे, असे स्पष्टीकरण श्री. भुजबळ यांनी विधानसभा नियम ४८ नुसारच्या स्पष्टीकरणात दिले.

श्री. भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार प्रवीण दरेकर, आमदार योगेश सागर यांनी ही म्हण वापरली असल्याचा दाखला दिला. त्याचे इतिवृत्त सभागृहात ठेवले. श्री. फडणवीस यांनी श्री. भुजबळ यांच्या स्पष्टीकरणाचे समर्थन केले. सभागृहात म्हणींचा वापर केल्यानंतर त्याचा वेगळा अर्थ घेऊ नये, असेही श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: Nashik Crime News : धनादेश न वाटल्याप्रकरणी महिलेला कारावास अन् 8 लाखांचा दंड!