Latest Marathi News | अपेक्षा पालकमंत्र्यांकडून : ‘Metro Neo’चा नारळ कधी फुटणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Neo Metro news

अपेक्षा पालकमंत्र्यांकडून : ‘Metro Neo’चा नारळ कधी फुटणार?

नाशिक : महापालिकेच्या २०१७ च्या निवडणूक प्रचारवेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेत असल्याची घोषणा केली. त्यानुसार शहरात वाढत्या सार्वजनिक वाहतुकीची गरज लक्षात घेता नाशिककरांना टायरबेस मेट्रो प्रकल्प दिला. केंद्रीय अर्थसंकल्पात प्रकल्पाची घोषणा झाली, निधीची तरतूदही झाली; मात्र अद्यापही नारळ फुटत नसल्याने मेट्रो न्यूओचे घोडे नेमके अडले कुठे? हे शोधण्याची जबाबदारी पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर आली आहे.

विकास झालेल्या व प्रगतिशील शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेची समस्या बिकट झाली आहे. त्यामुळे खासगी वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, त्यातून अनेक समस्या निर्माण होत आहेत. या समस्यांवर काही प्रमाणात सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेचा तोडगा आहे. मुंबई-पुणे इतकी नाशिकची प्रगती झाली नसली तरी वेगाने विकसित होणारे शहर म्हणून नाशिक पुढे येत आहे. त्यामुळे आत्ताच नाशिकमध्ये पायाभूत सेवांची बळकटी होणे गरजेचे आहे.

त्या अनुषंगाने काही प्रमाणात सेवादेखील उपलब्ध होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नाशिककरांना मेट्रो न्यूओ प्रकल्प केंद्र व राज्य शासनाने दिला. ज्या शहरात ताशी वीस हजार प्रवासी उपलब्ध होतात, त्या शहरात मेट्रो रेल्वे प्रकल्प निर्माण केला जातो. नाशिकमध्ये ताशी पंधरा हजार प्रवासी उपलब्ध होत असल्याने मेट्रो होऊ शकत नाही. त्याला पर्याय म्हणून टायरबेस मेट्रो चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. इन्फ्रास्ट्रक्चर मेट्रो रेल्वेचे परंतु रेल्वे रूळऐवजी टायरबस मेट्रो न्यूओ प्रकल्पात आहे.

देशातील पहिला प्रकल्प

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नाशिकमध्ये देशातील पहिला टायरबेस मेट्रो न्यूओ प्रकल्प साकारणार आहे. केंद्र सरकारनेदेखील अर्थसंकल्पात त्यासाठी जवळपास दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. जपानच्या कंपनीच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविला जाणार आहे. मात्र घोषणा होऊन अडीच वर्षांचा कालावधी उलटला तरी अद्यापही प्रकल्पाचा नारळ फुटलेला नाही.

हेही वाचा: Dasara Ravan Dahan 2022 : जय श्रीरामाच्या घोषात रावणदहन

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर फाइल येते, मात्र त्यावर विचार होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात मेट्रो न्यूओ प्रकल्प तयार करायचा असल्याने नाशिकच्या प्रकल्पाला विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. वाराणसी शहरासह टू टीअर सर्वच शहरांमध्ये असा प्रकल्प होण्याची आवश्यकता आहे. मात्र त्यापूर्वी नाशिक शहरात प्रकल्पाची घोषणा झाल्याने हा प्रकल्प राबविण्यास विलंब का होत आहे, याची तपासणी होणे आवश्यक आहे.

"लोकल कनेक्टिव्हिटीला चालना मिळण्यासाठी मेट्रो प्रकल्प गरजेचा आहे. वाहतुकीची समस्या कमी होण्याबरोबरच प्रदूषणाच्या समस्येवरदेखील काही प्रमाणात मात होईल. या माध्यमातून नागरिकांना हायटेक प्रवासाच्या सुविधा उपलब्ध होतील. प्रकल्प लवकरात लवकर होणे गरजेचे आहे." - तुषार वाघमारे, नाशिक

"मेट्रोची व्यवस्था झाल्यास वाहतूक कोंडी होणार नाही. सामूहिकरीत्या प्रवास होऊन इंधनाची बचत होईल व प्रदूषणाची समस्या सुटण्यास मदत होईल. नागरिकांचा प्रवास सुखकर होईल. विशेष करून नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा विशेष लाभ होणार आहे. मेट्रो सुरू झाल्यास नाशिकची लोकल कनेक्टिव्हिटी वाढवून प्रगतीला चालना मिळेल."

- संजय कल्याणी, नागरिक

हेही वाचा: Nashik Burglary Crime : 5 सराईत घरफोड्यांना अटक; 45 तोळे सोने, रोकड जप्त