टुडे पान ३ संक्षिप्त पट्टा

टुडे पान ३ संक्षिप्त पट्टा
Published on: 
संक्षिप्त पट्टा जादा एसटी बस सोडण्याची मागणी जळगाव : दिवाळीच्या काळात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने विशेष नियोजनाद्वारे जादा गाड्या सोडण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. विशेषत: भुसावळ-पुणे रातराणी बस तातडीने सुरू करावी, जेणेकरून खासगी ट्रॅव्हल्सवरील अवलंबित्व कमी होऊन प्रवाशांना परवडणाऱ्या दरात सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा नागरिक व चाकरमान्यांकडून व्यक्त होत आहे. दिवाळी सणानिमित्त पुण्यात नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी राहणाऱ्या नागरिकांना गावी येण्यासाठी प्रवाशांना कसरत करावी लागत आहे. पुण्याकडून भुसावळकडे येणाऱ्या बसमध्ये प्रवाशांची गर्दी प्रचंड वाढली असून, खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी तिकीट दरात मोठी वाढ केल्याने प्रवाशांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ---- जिल्ह्यातील कर्मचारी उद्या मोर्चात जाणार जळगाव : राज्यातील अकृषिक विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी येत्या गुरुवारी (ता.५) पुणे येथील शिवाजी नगरातील उच्चशिक्षण संचालनालयावर मोर्चा काढून एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या मोर्चात व आंदोलनात जळगावसह धुळे व नंदूरबार जिल्ह्यांतील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृति समितीचे अध्यक्ष अजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे. तरी खानदेशातील तीनही जिल्ह्यांतील विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या मोर्चा व आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षकेतर सेवक संयुक्त कृती समिती संलग्नित शिक्षकेतर कर्मचाराी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश म्हसे-पाटील, महासचिव रावसाहेब त्रिभुवन, कार्यसचिव गोपाल सोनवणे आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे. ---- शेतशिवारांमध्ये केबल चोरीचे सत्र जळगाव : ग्रामीण भागातील शेतशिवारांमध्ये शेती साहित्य व केबल चोरीचे सत्र सुरूच असून, चोरट्यांच्या वाढत्या सुळसुळाटामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. नुकतीच बुधवारी रात्री दहिगाव परिसरातील विरावली शिवारात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. या भागात चोरट्यांनी रवींद्र जीवराम पाटील यांची ८ हजार रुपये किमतीची १०० मीटर लांबीची सोलर वायर लांबविली. तसेच किशोर वासुदेव पाटील यांचीही १०० मीटर केबल वायर तोडून नेली. दहिगावसह लगतच्या शिवारात चोऱ्यांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. मात्र, पोलिस प्रशासनाकडून याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात असल्याचा संतप्त आरोप त्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे. ---- पलोड स्कूलमध्‍ये दंत तपासणी जळगाव : काशिनाथ पलोड पब्लिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत दंत तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ४४२ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी दंततज्ज्ञ डॉ. अश्विनी चव्हाण आणि डॉ. तेजस रावेरकर यांनी विद्यार्थ्यांची दंत तपासणी केली. तसेच प्रियंका जोशी आणि हर्षा वाणी यांनी त्यांना या कामात सहकार्य केले. विद्यार्थ्यांना दातांची योग्य पद्धतीने स्वच्छता कशी राखायची, तोंडाच्या आरोग्याचे महत्त्व, सकस आहार आणि दातांमध्ये कीड होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच ज्या विद्यार्थ्यांना दातांसंबंधी काही समस्या, आजार जाणवले त्यांना डॉक्टरांनी पुढील उपचाराबाबत सल्ला दिला. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.