लोगो : बनावट शालार्थ घोटाळा
भाऊसाहेब चव्हाण यांनाही अंतरिम जामीन
सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; नऊ संशयित अद्याप कारागृहात
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १७ : बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणातील संशयित आरोपी भाऊसाहेब चव्हाण यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी याच प्रकरणातील संशयित शिक्षणाधिकारी किरण कुवर यांनाही आठ दिवसांपूर्वी न्यायालयाने अंतरिम जामीन दिला होता. त्यामुळे दोघांनाही दिलासा मिळाला असला, तरी हा जामीन अंतरिम स्वरूपाचा असल्याने प्रकरणातील कायदेशीर प्रक्रिया अद्याप सुरूच आहे.
या घोटाळ्याच्या तपासात सुरुवातीला फिर्यादी असलेल्या भाऊसाहेब चव्हाण यांचे नाव पुढे आले होते. तपासाची व्याप्ती वाढल्यानंतर विविध बाबींची पडताळणी करताना तपास यंत्रणेने त्यांना संशयित आरोपी केले. त्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला.
दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत नऊ संशयितांना अटक करण्यात आली असून, ते न्यायालयीन कोठडीत मध्यवर्ती कारागृहात आहेत. त्यापैकी अद्याप एकालाही जामीन मिळालेला नाही. दुसरीकडे, चव्हाण आणि कुवर यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा मिळाल्याने या प्रकरणातील तपास आणि न्यायालयीन घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील शाळा पोलिसांच्या रडारवर
बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास आता जिल्ह्यातील काही शाळांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. संबंधित शाळांशी निगडित महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कागदपत्रांची पडताळणी सुरू असून, त्यातून तपासाची पुढील दिशा निश्चित होणार आहे. त्यामुळे या घोटाळ्यात आणखी कोणाची नावे समोर येतात, याकडे लक्ष लागले आहे.