10297
पिंपळगाव बसवंत : वाहनचालकांकडे पैशांची मागणी करणाऱ्या तोतया पोलिसाला अटक करताना पोलीस निरीक्षक गणेश गुरव.
तोतया वाहतूक पोलिसाकडून पैशांची मागणी
चिंचखेड चौफुलीवरील प्रकार उघड; गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
पिंपळगाव बसवंत, ता. ३ : वाहतूक पोलिस असल्याचे भासवून वाहनचालकांकडून पैशांची मागणी करणाऱ्या तोतया पोलिसाला ताब्यात घेण्यात आले. पिंपळगाव बसवंत येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. अंगावर महाराष्ट्र पोलिस असा बॅज, वाहतूक पोलिसांचा लोगो असलेला गणवेश आणि हातात पांढऱ्या रंगाचे मशीन घेऊन वाहनचालकांना अडविणाऱ्या आकाश बाळासाहेब क्षीरसागर (रा. ओझर) याच्याविरुद्ध पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी (ता.२ नोव्हेंबर) दुपारी साडेतीनला चिंचखेड चौफुली येथील सर्व्हिस रोडवर हा प्रकार घडला. संशयिताने खाकी रंगाची पँट, काळा बेल्ट, महाराष्ट्र पोलीस बॅज आणि वाहतूक पोलिसांचा लोगो असलेला गणवेश परिधान केला होता. हातात पांढऱ्या रंगाचे मशीन घेऊन आपण वाहतूक पोलिस असल्याचे भासवत तो वाहनचालकांकडे पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे, संशयित यापूर्वी नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरात ट्रॅफिक वॉर्डन म्हणून काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पिंपळगाव बसवंत येथे कोणतीही अधिकृत नियुक्ती किंवा शासकीय अधिकार नसताना त्याने वाहतूक पोलिस असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.