esakal | उन्हाळा कांद्याच्या दरात घसरण; शेतकऱ्यांचे बिघडले आर्थिक नियोजन
sakal

बोलून बातमी शोधा

onion

कांदा उत्पादकांचे आर्थिक नियोजन बिघडले; दरात घसरण

sakal_logo
By
प्रमोद पाटील

चिचोंडी (जि. नाशिक) : कांद्याचे (onion) माहेरघर म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात (nashik) उन्हाळ कांद्याच्या दरात मागील काही दिवसांपासून घसरण होत चालली आहे. गेल्या काही दिवसात सरासरी पाचशे रुपयांनी दर कोसळले आहेत. दुसरीकडे भाववाढीच्या अपेक्षेने साठविलेला उन्हाळ कांदा चाळीतच खराब होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. एकीकडे घसरलेले दर व दुसरीकडे चाळीत खराब होत असलेला कांदा या दुहेरी संकटाने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडून गेले आहे.

उन्हाळा कांद्याच्या दरात घसरण

मागीलवर्षी रोपे खराब झाल्याने नंतर बियाण्यांचे दर तिप्पट झाले होते. बाहेरील जिल्ह्यातून महागडे बियाणे घ्यावे लागले होते. त्यातही फसवणूक झाली. काही ठिकाणी कांदा सुरवातीला जमिनीतच सडून जाण्याचा प्रकार घडला. काही ठिकाणी डोंगळे निवडणे, रांगडा निवडणे असा प्रकार झाला होता. त्यामुळे बियांण्यांमध्ये फसगत झाल्याने कांद्याचे खराब होण्याचे प्रमाण अधिक असल्याने शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती.

कांदा साठवावा की नाही

कांद्याना डोंगळे आल्याने यंदा कांदा साठवावा की नाही अशी स्थिती उभी राहिली होती. डोंगळे आलेले कांदे आधीच पाण्याविना करपून चालले होते. त्यात डोंगळ्यांचे प्रमाण अधिक असल्याने कांदा साठविल्यास लवकर खराब होण्याची धास्ती शेतकरींना होती मात्र भाववाढीच्या अपेक्षेने ठेवलेले हे कांदे लवकरच खराब होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यातच कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने उत्पादन खर्च फिटने देखील सध्या शेतकऱ्यांना कठिण झाले आहे. मागील काही दिवसांपासून कांद्याचे दर पाचशे रुपयांनी घसरल्याने आर्थिक नुकसान होत आहे. आता साठवलेला कांदा भाव वाढतील या अपेक्षेने ठेवावा की अल्प दरात विकावा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

हेही वाचा: नांदगावचे जनजीवन पूर्वपदावर; प्रशासकीय पातळीवर हालचाली गतिमान

मोठ्या कष्टातून पिकवलेल्या उन्हाळ कांदाच्या उत्पन्नावर मागील देणे फेडू अशा अपेक्षेने साठवला मात्र कांद्याचे दर वाढणे सोडून कमी होत आहेत. यातून खर्च कधी निघणार असे असताना कांदाही आता खराब होत आहे, परिणामी तो उकीरड्यावर फेकण्याची वेळ आलेली आहे. मायबाप सरकारने कांद्याला परवडेल असा सरासरी किमान दोन हजार रुपये दर द्यावा. - अभिजित राजगुरू, शेतकरी, चिचोंडी बुद्रुक.

"केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्यात धोरणामुळे नेहमीच कांदा उत्पादकांना आर्थिक नुकसान होत असते कांद्याचे दर आता रासरी १२ ते १३ रुपये प्रति किलो इतके घसरल्याने शेतकर्‍यांचे उत्पादन खर्च भरून निघणे कठीण झाले असून महाराष्ट्र शासनाने व केंद्र शासनाने तात्काळ कांदा दरावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेऊन शेतकर्‍यांना दिलासा द्यावा अन्यथा संपूर्ण राज्यभर कांदा उत्पादकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल तात्काळ कांद्याचे दर वाढ न झाल्यास राज्यभर कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून रास्ता रोको आंदोलने केली जातील." - भारत दिघोळे, संस्थापक अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

हेही वाचा: अधिकाऱ्यांमधील विसंवादामुळे संपूर्ण शहर वेठीस : आमदार फरांदे

loading image
go to top