खून प्रकरणी मेहुण्यासह
सहा संशयिताना अटक
पाच दिवसाची पोलिस कोठडी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २७ : बहिणीला नांदविण्यावरून झालेल्या कौटुंबिक वादातून सनी डोळे याची धारदार शस्त्राने भोसकून मेहुण्याने खून केला. या प्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल होऊन संशयित मेहुणा सूरज वानखेडे, त्याच्या कुटुंबातील सहा संशयिताना पोलिसांनी अटक केली. त्यांना मंगळवारी (ता. २७) न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सर्व संशयिताना पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली.
छत्रपती शिवाजीनगरातील जे. के. जिनिंगजवळील रहिवासी विद्या विनोद डोळे यांच्या घरात मुलगी चांदणी हिच्या नांदवण्यावरून उभय पक्षाची बैठक बोलावली होती. चर्चा सुरू असताना, चांदणीचा पती सूरज वानखेडे याने वाद घालून सनी विनोद डोळे (वय २२) याच्यावर शस्त्राने सपासप वार केल्याने तो जागेवरच कोसळला. त्यास रुग्णालयात दाखल केल्यावर त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात विद्या डोळे यांच्या तक्रारीवरून सूरज वानखेडे, रोशन वानखेडे, निकेश वानखेडे, नारायण वानखेडे, मंगला वानखेडे आणि प्रमिला मधुकर वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. संशयिताना अटक झाली. सर्व संशयिताना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सर्व संशयिताना ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सहायक निरीक्षक सुरेश आव्हाड तपास करीत आहेत.