निसर्ग पर्यटन
NSK26H32154
फरकांडे (ता. एरंडोल) : येथील झुलते मनोरे.
---
अद्भुत वास्तुकलेचा नमुना
----------------------
फरकांडेचे झुलते मनोरे
एरंडोल, पारोळा आणि भडगावच्या सीमेवर भुईकोट किल्ल्याच्या कुशीत वसलेले ‘फरकांडे’ हे गाव ऐतिहासिक झुलत्या मनोऱ्यांमुळे जागतिक नकाशावर आहे. अंगाखांद्यावर किल्ल्याचे अवशेष आणि तटबंदीच्या पाऊलखुणा मिरवत हे गाव आपला गौरवशाली इतिहास सांगते. याच ऐतिहासिक वैभवाचा आणि अद्भुत वास्तुकलेचा घेतलेला धांडोळा...
- प्रतिनिधी
जगभरात केवळ तीनच झुलते मनोरे असून इटली आणि अहमदाबादनंतर तिसरा मनोरा जळगाव जिल्ह्यातील फरकांडे येथे आहे. राजपत्रात नोंद असलेले हे प्राचीन ऐतिहासिक स्मारक पर्यटकांचे मोठे आकर्षण आहे. मात्र, पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे या वास्तुकलेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कासोद्यापासून केवळ पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या फरकांडे येथील दोन मनोऱ्यांपैकी एक मनोरा सुमारे ३५ वर्षांपूर्वी (१९९१ मध्ये) पडला, तर दुसराही कोसळण्याच्या स्थितीत आहे.
पुनरुज्जीवनाचा प्रयत्न
झुलत्या मनोऱ्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर पहिल्या टप्प्यात दुरुस्तीसाठी एक कोटी १७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली झारखंड व नांदेड येथील तज्ज्ञ कारागिरांनी दुरुस्ती केली. तुटलेल्या भिंतींच्या बांधकामासाठी पूर्वीप्रमाणेच विटा व कोरीव दगड वापरण्यात आले. मनोऱ्यांना पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी उर्वरित कामही मूळ स्वरूपात करण्याचे नियोजन विभागाने केले आहे.
न उलगडलेले गूढ
सुमारे चाळीस वर्षांपूर्वी झुलते मनोरे सुस्थितीत होते. त्यावेळी एका मनोऱ्याला हलविल्यास दुसराही आपोआप हलत असे. तत्कालीन ब्रिटिश सरकारने मनोऱ्यांचे खोदकाम करून त्यामागील रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना यश आले नाही. या मनोऱ्यांची उभारणी नेमकी केव्हा आणि कोणी केली, याची माहिती आजही उपलब्ध नसून त्यांचे गूढ कायम आहे.
मनोऱ्यांची रचना
दोन्ही झुलत्या मनोऱ्यांची उंची सुमारे ५० फूट असून, त्यांचे बांधकाम चुना व विटांनी केले आहे. मनोऱ्यावर जाण्यासाठी ५६ गोलाकार पायऱ्या आहेत. आतील बाजूस १५ मीटर लांबीची महिरपी भिंत आहे. अरुंद मार्गातून एका वेळी एकच व्यक्ती जाऊ शकते. चढताना हवा व प्रकाशासाठी ठिकठिकाणी खिडक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
ऐतिहासिक हत्ती हौद
फरकांडे येथे पूर्वी हत्तींचा मोठा व्यापार होत असे. मनोऱ्यांच्या परिसरात हत्तींसाठी बांधलेला पाण्याचा भव्य हौद आजही सुस्थितीत आहे. या हौदात मागील बाजूच्या विहिरीतून पाणी आणण्यासाठी विटांच्या आकर्षक नाल्यांचे विशेष बांधकाम करण्यात आले होते.
इन्फो...
पर्यटन आणि रोजगार
मनोऱ्यांच्या आतील भागात मंदिराच्या आकाराचे तीन घुमट आहेत. पूर्वी येथे देशभरातून पर्यटकांची व सहलींची मोठी गर्दी व्हायची. पुरातत्त्व विभागाने या मनोऱ्यांची पूर्ववत पूर्ण दुरुस्ती केल्यास फरकांडे गावाला गतवैभव मिळण्यासोबतच स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील.
इन्फो...
फरकांडेला कसे जावे?
फरकांडे येथील ऐतिहासिक झुलते मनोरे पाहायला जाण्यासाठी रस्ते वाहतूक हा सर्वात उत्तम पर्याय आहे. हे ठिकाण जळगावपासून सुमारे ५१ किलोमीटर तर एरंडोलपासून १५ किमी अंतरावर आहे. या ठिकाणी जाण्यासाठी आधी राष्ट्रीय महामार्गावरील एरंडोल येथे जावे लागते. एसटी बस थेट फरकांडे गावापर्यंत जाते. रेल्वेने जायचे असल्यास जळगावला उतरून रस्ते मार्गाने जावे लागते.