(पान ४ ला मेन)
SKD26B04330
शिंदखेडा : आढावा बैठकीत बोलताना पालकमंत्री जयकुमार रावल. शेजारी नारायण पाटील, शरद मंडलिक, नितीनकुमार देवरे, उदय देसले आदी.
---------
कोणत्याही विभागाचा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही
पालकमंत्री जयकुमार रावल : आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना इशारा
सकाळ वृत्तसेवा
शिंदखेडा, ता. ६ : पावसाचा महिनाभर खंड, संकटात आलेली खरीप पिके आणि शेतातील वीजपंप- केबल चोरीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संकटात असताना कोणत्याही विभागाचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिला.
शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीचा त्यांना आढावा घेतला. या वेळी महसूल, कृषी, महावितरण, जलसंपदा, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा, रोजगार हमी व पोलिस प्रशासनाच्या कामकाजाची माहिती घेतली. तालुक्यात सरासरी ५०१.४० मिमीच्या तुलनेत ४०६.९० मिमी म्हणजे ८१.१५ टक्के पाऊस झाला आहे. ४ ऑक्टोबरअखेर ३५ गावांतील २२ हजार ८७० खातेदारांच्या २४ हजार ३१५ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. एकही पात्र शेतकरी वंचित राहू नये, असे निर्देश त्यांनी या वेळी दिले.
वीजपंप व केबल चोरीने शेतकरी दुहेरी संकटात सापडत आहे. महावितरण व पोलिस प्रशासनाने गस्त वाढवून कठोर कारवाई करावी, तसेच तक्रारी प्राधान्याने निकाली काढाव्यात, अशा सूचना मंत्री रावल यांनी दिल्या.
दुष्काळाचा परिणाम केवळ उभ्या पिकांपुरता मर्यादित राहत नाही. त्याची झळ शेतकऱ्यांचे उत्पन्न, ग्रामीण रोजगार, पिण्याचे पाणी, पशुधन, सिंचन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था या सर्वांना बसते. त्यामुळे सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून शेतकरी, पशुपालक आणि सर्वसामान्य नागरिकांना वेळ दिलासा मिळेल, याची खात्री करावी, असे स्पष्ट निदर्शने पालकमंत्री रावल यांनी बैठकीच्या शेवटी दिले.
या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप, उपायुक्त गिरीश पाटील, कार्यकारी अभियंता जयश्री साळवे, भूवैज्ञानिक गिरीष भोरे, कार्यकारी अभियंता भाऊसाहेब पाटील, प्रांताधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार नितीनकुमार देवरे, साहेबराव सोनवणे, अभिजित अहिरे, गटविकास अधिकारी सोनवणे, श्रुती कारंडे, मुख्याधिकारी तुषार सोनवणे, देवेंद्रसिंग परदेशी, गटशिक्षणाधिकारी कविता मेखे, किरण शिंदे, तालुका कृषी अधिकारी सुधीर ईशी, सोनवणे, सहायक निबंधक शिरगावे, उपकार्यकारी अभियंता जाधव, मोटझरे, अहिरे, उपविभागीय अधिकारी पवार, सहायक आयुक्त साळुंखे, उपअभियंता सावंत, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भूषण वाकडे, पोलिस उपनिरीक्षक आव्हाणे, ढाकणे, साळुंखे आदी उपस्थित होते.
--------------
पाणीटंचाई, चाऱ्याचे नियोजन
२०२६- २७ च्या पाणीटंचाई कृती आराखड्यासाठी २५२.९८ लाख रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. टंचाईची वाट न पाहता गावनिहाय स्रोत, टँकर, विहीर अधिग्रहणाचे नियोजन आधीच करावे. तालुक्यात ६८ हजार ५८० मेट्रिक टन चारा उपलब्ध असून, तो १३९ दिवस पुरेल. तीन लाख १७ हजार ९३० नोंदणीकृत मजुरांसाठी पाच हजार ५८७ शेल्फवरील, तर एक हजार ३९ कामे सुरू आहेत. मागणी येताच काम मिळाले पाहिजे. प्रधानमंत्री पीक विमा, ई- पीक पाहणी व ॲग्रीस्टॅकमध्ये तांत्रिक कारणाने शेतकरी वंचित राहू नये. रब्बी हंगामासाठी कमी पाण्यावरील पिकांचे मार्गदर्शन द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.