Nashik News : अंगावर वीज पडल्याने तांदूळवाडीत शेतकरी ठार; हिरेनगरलाही 2 म्हशी दगावल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lightning struck

Nashik News : अंगावर वीज पडल्याने तांदूळवाडीत शेतकरी ठार; हिरेनगरलाही 2 म्हशी दगावल्या

नांदगाव/बाणगाव बुद्रुक (जि. नाशिक) : तांदूळवाडी (ता. नांदगाव) येथील नाना गमन चव्हाण (वय ६०) शेतात काढून ठेवलेले कांदे झाकण्यासाठी गेले असता अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर हिरेनगर येथेही शेतकरी नारायण बिन्नर यांच्या दोन म्हशी वीज पडल्याने ठार झाल्या. (Farmer killed in tandulwadi due to lightning 2 buffaloes died at Hirenagar Nashik News)

तालुक्यात विजांच्या कडकडाटासह तुरळक स्वरूपात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मोठी धांदल उडाली. सोमवारी (ता. १३) मध्यरात्री साडेबारानंतर विजांच्या कडकडाटासह व लखलखणाऱ्या प्रकाशाने आसमंत भरून आले होते.

तांदूळवाडी येथील नाना चव्हाण हे उपसरपंच सुदाम काळे यांच्या दुचाकीवरून शेतात कांदे झाकण्यासाठी गेले होते. कांदे झाकत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. उपसरपंच काळे यांच्या डोळ्यादेखत घडलेल्या या प्रकाराची माहिती त्यांनी चव्हाण यांच्या कुटुंबीयांना दिली.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

त्यानंतर माहिती मिळताच तलाठी अमित उगले, पोलिसपाटील, सरपंच यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दरम्यान, हिरेनगर येथे नारायण बिन्नर यांच्या दोन म्हशीदेखील वीज पडल्याने ठार झाल्या. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यातच तालुक्यातील साकोरा व नारायणगाव येथे वीज कोसळून दोन जनावरे ठार झाली होती.

गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या गव्हाचे मोठे नुकसान झाले. त्यातच सोमवारी मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे कापणीला आलेल्या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी दुहेरी अडचणीत सापडल्याने सरकारने या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.