अबब! शेतकऱ्यांचा नादच खुळा...!; खिल्लार बैलजोडीची साडेतीन लाखांना विक्री

A pair of white Khillar bullocks were sold for Rs 3 & half lakhs at Nampur
A pair of white Khillar bullocks were sold for Rs 3 & half lakhs at Nampuresakal

नामपूर (जि. नाशिक) : आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेती व्यवसायात मोठ्या प्रमाणात यांत्रिक अवजारांचा वापर वाढल्याने शेतकऱ्यांकडे असणारे पशुधन दिवसेंदिवस घटत चालल्याचे चित्रसर्वत्र पाहायला मिळते.

अशा प्रतिकूल परिस्थितीत येथील बाजार समितीच्या आवारात एका तरुण शेतकऱ्याने तब्बल साडेतीन लाख रुपयांना बैलजोडी खरेदी करून सर्जा-राजावरील आपले प्रेम अधोरेखित केले आहे. बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदा बैलजोडी खरेदीसाठी साडेतीन लाखांची बोली लागली आहे. (farmer Sale of Khillar bullocks for three half lakhs Nashik Latest Marathi News)

१९७५ पासून सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत येथे उपबाजार आवार कार्यान्वित असल्यापासून जिल्ह्यातील वैभवशाली परंपरा असलेला बैल बाजार हे येथील वैशिष्ट्ये आहे. दर बुधवारी बाजार समितीच्या आवारात भरणाऱ्या बैलबाजारात शेकडो जनावरे विक्रीसाठी येतात.

नगर जिल्ह्यातील बैल व्यापारी कर्नाटक राज्यातून बैलांची खरेदी करून परिसरातील शेतकऱ्यांना बैलांची सेवा पुरवतात. विशेष बाब म्हणजे अनेक व्यापारी शेतकऱ्यांना उधारीवर व्यवहार करतात. शेतकऱ्यांकडून टप्याटप्याने वसुली करत असतात.

यंदा मोसम खोऱ्यात वरुण राजाची मेहेरबानी असल्याने शेतशिवार फुलल्याने येथील जनावरांचा बाजारही बहरला आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात जनावरे विक्रीसाठी आणली जात आहेत. यंदा पावसाचे प्रमाण चांगले असल्याने येथील बाजारात जनावरांचे भाव वधारले आहेत. उत्तम प्रतीच्या बैलजोडीला लाख रुपयांपेक्षा अधिकचा भाव मिळत आहे.

गाळणे ( ता. मालेगाव ) येथील चंद्रकांत सोनवणे गाळणेकर या बैल व्यापाऱ्याकडून पाडगण ( ता. कळवण ) येथील विष्णू बागुल युवा शेतकऱ्याने पांढऱ्या रंगाची खिल्लार जातीची बैलजोडीची बुधवारी ( ता. १७ ) खरेदी केली.

बैलांच्या खरेदीचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर सदर बैलजोडी पाहण्यासाठी, शेतकरी प्रेमाचे दृश्य मोबाईलमध्ये टिपण्यासाठी, फोटो, व्हिडीओ काढणाऱ्यांची बाजार समितीच्या आवारात मोठी झुंबड उडाली होती. बाजार समितीचे सभापती कृष्णा भामरे, उपसभापती लक्ष्मण पवार, सचिव संतोष गायकवाड, उपसचिव अरुण अहिरे आदींच्या हस्ते बैलजोडी खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याचा बाजार समितीकडून सत्कार करण्यात आला. यानंतर वाजतगाजत बैलांची मिरवणूक काढण्यात आली.

बाजार समितीच्या आवारात गेल्या ४८ वर्षांपासून भरणाऱ्या बैलबाजारामुळे मोसम खोऱ्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात सोय झाली आहे. शेती व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या बैलजोडींच्या किमती गगनाला भिडल्या असल्या तरी शेतकऱ्यांचे सर्जा-राजावरील प्रेम मात्र कायम आहे. येथील बाजार समितीत बैल व्यापाऱ्यांना चांगल्या दर्जाच्या सेवा देण्यासाठी बाजार समिती प्रशासन कटिबद्ध आहे. - कृष्णा भामरे, सभापती नामपूर बाजार समिती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com