खाद्यतेलांच्या महागाईवर साठा निर्बंधाची मात्रा

निर्बंध शेतकऱ्यांना मारक अन्‌ भाववाढीची तक्रार
edible oil
edible oilsakal
Updated on

नाशिक : रशिया-युक्रेनमधील संघर्षाची ठिणगी अन्‌ मलेशियामधील उत्पादनावर झालेल्या परिणामांसह इतर कारणांमुळे ऐन लग्नसराईमध्ये खाद्यतेलाच्या किमती किलोमागे २० रुपयांनी भडकल्या आहेत. त्यावर मात्रा म्हणून केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारने खाद्यतेलांसह तेलबियांच्या साठ्यावर निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध शेतकऱ्यांना मारक असून, ते तातडीने मागे घेण्याची मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केली. त्याच वेळी निर्बंधांमुळे भाववाढ होण्याची भीती व्यापाऱ्यांना वाटू लागली आहे.

व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या दहा दिवसांमध्ये खाद्यतेलाच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. देशात सोयाबीन, सूर्यफूल, पामतेलाची आयात अधिक होते. नाशिकसाठी सटाणा, धुळे आणि गुजरातमधून शेंगदाणा विक्रीसाठी उपलब्ध होतो. बाजारात शेंगदाण्याचे भाव किलोला १० ते २० रुपयांनी वाढले असून, शेंगदाण्यापासून खाद्यतेल किलोला ३० टक्के मिळते. शेंगदाणा तेलाच्या भाववाढीला ही बाब कारणीभूत ठरली आहे. दरम्यान, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्यतेलांच्या किमतीमध्ये वाढ झाली असल्याने केंद्राने खाद्यतेल आणि तेलबियांच्या साठवणुकीवर निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध ३० जूनपर्यंत लागू राहणार आहेत. या निर्बंधाची अंमलबजावणी राज्यात करून साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी, असे निर्देश अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सहसचिव चारुशीला तांबेकर यांनी यंत्रणेला दिले आहेत.

खाद्यतेल आणि तेलबियांच्या निर्बंधापेक्षा अधिक साठा असल्यास त्याबाबतचा तपशील https://evegoils.nic.in या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर करायचा आहे. निर्बंधाच्या दिवसापासून ३० दिवसांच्या आत मर्यादेपर्यंत साठा कमी करायचा आहे, असेही निर्देशात स्पष्ट करण्यात आले आहे. साठ्यावरील निर्बंधाची आकडेवारी क्विंटलमध्ये अशी : खाद्यतेल : किरकोळ- ३०, घाऊक- ५००, मोठे ग्राहक- किरकोळ ३०, डेपो- एक हजार (९० दिवस साठवणूक क्षमता). खाद्य तेलबिया : किरकोळ- १००, घाऊक- दोन हजार (९० दिवसांचे खाद्यतेल उत्पादन).

एकरी ३० हजारांचे नुकसान

अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाल्याने तेलबियांचा तुटवडा निर्माण झाला. सोयाबीनला चांगले दर मिळू लागले. खाद्यतेल व पेंडीचे दर वाढल्याने तेल व पोल्ट्री व्यावसायिकांच्या दबावामुळे केंद्र सरकारने परदेशातून तेलाची, पेंडीची आयात केली, आयात शुल्क शून्य केले, वायदे बाजारावर बंदी घातली आणि ३१ मार्चपर्यंत साठ्यावर निर्बंध घातले होते. त्याचा थेट परिणाम तेलबियांच्या किमतीवर झाला. नऊ हजार रुपये क्विंटल दराने विकणारे सोयाबीन पाच हजार रुपयांपर्यंत घसरले. आता सोयाबीनच्या भावात तेजी येत असताना तेलबियांच्या साठ्यावरील मर्यादेची मुदत वाढविली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे क्विंटलला चार ते पाच हजारांचे, तर एकरी २५ ते ३० हजारांचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागेल, असे श्री. घनवट यांनी म्हटले आहे.

सरकारच्या निर्बंधाच्या कृतीचा निषेध करण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षाचे कार्यकर्ते राज्यातील जिल्हाधिकाऱ्‍यांना निवेदन देतील. साठ्यांवरील निर्बंधांचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली जाईल. तसेच सरकार जर शेतकऱ्‍यांना शेतमालाचे पैसे मिळू देणार नसेल, तर शेतकरी वीजबिल कसे भरू शकेल? हा खरा प्रश्‍न आहे.

- अनिल घनवट, अध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष

किरकोळ व्यापारी रोज खाद्यतेल विकत घेतात आणि विकतात. असे व्यापारी मर्यादेपर्यंतचे खाद्यतेल खरेदी करण्यासाठी पैसे कोठून आणणार, हा प्रश्‍न आहे. त्याच वेळी घाऊक व्यापारी निर्बंधानुसार कोणत्या प्रकारच्या खाद्यतेलाचा साठा करतील, हाही प्रश्‍न अनुत्तरित राहतोय.

- परेश बोधानी, खाद्यतेलाचे व्यापार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com