दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी हेक्टरी ५० हजारांची मदत द्या! येवल्यात शिवसेना ठाकरे गटाची घोषणाबाजी करत मागणी, पीकविम्याची १०० टक्के रक्कमेची मागणी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी हेक्टरी ५० हजारांची मदत द्या! येवल्यात शिवसेना ठाकरे गटाची घोषणाबाजी करत मागणी, पीकविम्याची १०० टक्के रक्कमेची मागणी
Published on: 
सेकंड मेन फोटो- 27343 येवला : शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यावी या मागणीचे निवेदन तहसीलदार आबा महाजन यांना देताना शिवसेनेचे पदाधिकारी. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५० हजारांची मदत द्या! येवल्यात शिवसेना (उबाठा) गटाकडून पीकविम्याची १०० टक्के रकमेची मागणी सकाळ वृत्तसेवा येवला, ता. २७ : दुष्काळामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत तुटपुंजी मदत जाहीर करून शेतकऱ्यांची थट्टा करण्याऐवजी शासनाने दिवाळीपूर्वी हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, तसेच नुकसानग्रस्त पिकांचा पीकविमा तातडीने मंजूर करून त्याचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आली. येथे मंगळवारी (ता. २७) मदतीसह संपूर्ण कर्जमाफी, सरसकट दुष्काळी मदत आणि चारा छावण्या सुरू करण्याच्या मागण्यांसाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत शासनाचा निषेध केला. याबाबत तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देण्यात आले. या वेळी शासनाचा निषेध करण्यात आला. दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेली पाच हजारांची मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. या मदतीतून शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई होणे शक्य नसल्याने शासनाने हेक्टरी ५० हजार रुपये मदत देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. धरणांत मुबलक पाणीसाठा असतानाही पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन न मिळाल्याने लाभक्षेत्रातील पिके करपली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, या नुकसानीची भरपाई त्वरित मिळावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविम्याची १०० टक्के रक्कम द्यावी, अशी मागणीही करण्यात आली. याशिवाय पोखरा योजनेंतर्गत तालुक्याचा दुष्काळी धोरणात समावेश करावा, चारा छावण्या उभाराव्यात, तालुक्यातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावी, अशा मागण्या करण्यात आल्या. भीमाशंकर येथील कथित बेकायदेशीर वृक्षतोड थांबवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच मुंबई येथील शिवसैनिक प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येची निष्पक्ष चौकशी करून आरोपींना कठोर शासन करावे, अशी मागणीही करण्यात आली. शिवसेना उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे, वाल्मीक गोरे, झुंजार देशमुख, तालुकाप्रमुख छगन आहेर, शहरप्रमुख लक्ष्मण गवळी, युवासेना तालुकाप्रमुख संतोष गोरे, नितीन संसारे, कैलास घोरपडे, जनार्दन भवर, गणेश वडणेरे, गणेश पेंढारी, अनंत आहेर, विठ्ठल महाले, विकास गायकवाड, पंकज नळे, दिनेश पागिरे, महेश काळे, शरद जगताप, श्रिपाल मंडलेचा, रतन दाते, प्रतीक शिंदे, भावराव कुदळ, सनी घोटेकर, दशरथ खांडेकर, कल्पेश साळवे आणि रवींद्र चाकणकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com