
Nashik News : खमताणेत शेतकऱ्यांची मक्याची गंजी पेटवली; 8 लाखांपेक्षा जास्त नुकसान
सटाणा (जि. नाशिक) : खमताणे (ता. बागलाण) येथील शेतकऱ्यांनी अर्धा एकर क्षेत्रात साठवून ठेवलेल्या मक्याच्या गंजीला सोमवारी (ता. २) रात्री साडेआठच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अंधाराचा फायदा घेत आग लावली.
या भीषण आगीत जनावरांचा संपूर्ण चारा जळून खाक झाल्याने आठ लाखांपेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे. सटाणा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांसह स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. (Farmers corn pile set on fire in Khamtane More than 8 lakhs in damages Nashik News)
खमताणे येथील नवेगाव रस्त्यावरील धर्मा नानाजी इंगळे, विजय दयाराम इंगळे, वसंत दयाराम इंगळे, वाल्मीक रामदास इंगळे या पशुपालक अल्पभूधारक शेतकऱ्यांनी पंचक्रोशीतील मका उत्पादक शेतकऱ्यांकडून दुग्ध व्यवसायासाठी पाळलेल्या गायी म्हशी व लहान मोठ्या जनावरांसाठी प्रती ट्रॉली चार हजार रुपये प्रमाणे सुमारे १६५ ट्रॉली ट्रॅक्टर मक्याचा कोरडा चारा खरेदी केला होता.
लवकरच यंत्राच्या सहाय्याने चाऱ्याची ते कुटी करून साठवणूक करणार होते. मात्र, अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अर्धा एकर क्षेत्रात साठवलेल्या चाऱ्याच्या गंजीला आग लावली आणि तेथुन पळ काढला. यावेळी चिखलाने माखलेल्या पाऊलखुणांवरुन ही आग कुणीतरी अज्ञाताने लावल्याचे निदर्शनास येत होते.
यानंतर उफाळलेल्या आगीचा डोंब इतका प्रचंड होता की दहा ते बारा किलोमीटर अंतरापर्यंत त्याची दाहकता दिसत होती. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी तत्काळ दाखल होऊन आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक
हेही वाचा: Nashik News : वाढत्या मजुरीला लागणार यांत्रिक पेरणीमुळे ब्रेक!
दरम्यान, सटाणा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान, जेसीबी मशीन आणि शेकडो शेतकऱ्यांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचा प्रयत्न सुरू होते. महावितरण कंपनीने तत्काळ विजपुरवठा सुरळीत करून स्थानिक वीज पंप सुरू करण्यास मदत केली. मंगळवारी (ता. ३) सकाळी दहापर्यंत आग धुमसत होती.
बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, माजी आमदार संजय चव्हाण, तहसिलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सांत्वन केले. तहसिलदार श्री. इंगळे यांनी जागेवर महसुली पंचनामे करण्याचे आदेश देत अधिकाधिक आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले. आग लावणाऱ्याचा शोध घेण्यासाठी श्वानपथक मागवून त्याला कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.
"अल्पभूधारक शेतकऱ्यांचा संपुर्ण कोरडा चारा जळुन खाक झाल्याने लहान मोठ्या जनावरांची उपासमार होणार असून ती टाळण्यासाठी महसुल, कृषी विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोरडा चारा उपलब्ध करून द्यावा. तसेच तत्काळ आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा."
-कुबेर जाधव, समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना, नाशिक
हेही वाचा: NMC Eastern Divisional Office : कार्यालय स्थलांतराची घाई, कामास मात्र सापडेना मुहूर्त!