नासाकाच्या शेतकरी-कामगारांची देणी लवकरच देणार

नासाकाच्या शेतकरी-कामगारांची देणी लवकरच देणार
Published on: 
‘नासाका’च्या देण्यांवरून संघर्षाची ठिणगी --- ‘राजगंगा’ला आंदोलनाचा इशारा; लवकरच देणी अदा करण्याची घावटेंची ग्वाही सकाळ वृत्तसेवा नाशिक रोड, ता. ३ : नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या (नासाका) मागील गाळप हंगामातील शेतकरी व कामगारांच्या थकीत देण्यांवरून शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. थकीत रक्कम तातडीने अदा करण्याच्या मागणीसाठी माजी खासदार हेमंत गोडसे व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकरराव ढिकले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राजगंगा कंपनीचे संचालक राजेराम घावटे यांची भेट घेतली. देणी लवकरच अदा करण्याची ग्वाही घावटे यांनी दिली. मागील गाळप हंगामात राजगंगा युनिटने ‘नासाका’ चालविला होता. सुमारे ६० हजार टन उसाचे गाळप झाले. प्रतिटन तीन हजार एक रुपये दरानुसार शेतकऱ्यांना सुमारे १८ कोटी रुपये देणे अपेक्षित होते. त्यापैकी १४ कोटी रुपये अदा झाले असून, सुमारे चार कोटी रुपये थकीत असल्याचा दावा शेतकरी संघटनेने केला. कामगारांचे सुमारे एक कोटी रुपये वेतन, १४ लाखांचे वीजबिल आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे भाडे व टॅगिंगचे सुमारे पाच कोटी ६८ लाख रुपयेही बाकी असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. वीजबिल थकल्याने कारखान्याचा वीजपुरवठा सहा महिन्यांपासून खंडित आहे. थकीत देण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दोन बैठका होऊनही तोडगा न निघाल्याने शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला. देणी अदा न केल्यास राजगंगा कंपनी भविष्यात ज्या-ज्या ठिकाणी कारखाने सुरू करेल, तेथे आंदोलन करण्याचा इशारा ढिकले यांनी दिला. घावटे यांनी २०२४-२५ चा गाळप हंगाम आपण घेतला असून, त्या हंगामातील देणी देण्याची जबाबदारी आपली असल्याचे स्पष्ट केले. कंपनीने शेतकऱ्यांसाठी एक कोटी रुपयांची मदत केल्याचेही त्यांनी सांगितले. हेमंत गोडसे यांचा या हंगामाशी संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘देणी न दिल्यास आंदोलनात पुढे राहू’ ‘नासाका हा शेतकरी व कामगारांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आपण तीन वर्षे कारखाना चालवून सर्वांची देणी अदा केली. मागील हंगामातील थकीत देणी घावटे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे अदा करावीत. अन्यथा, शेतकऱ्यांच्या आंदोलनात आपण सर्वांत पुढे राहू,’ असा इशारा हेमंत गोडसे यांनी दिला. शिष्टमंडळाने घावटे यांना लेखी निवेदनही दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com