मेन
कर्जमाफीनंतर पीक कर्जाला ‘एनपीए’चा अडसर
मनमाडच्या युनियन बँकेतील शेतकऱ्यांच्या तक्रारी
भाऊसाहेब गोसावी - सकाळ वृत्तसेवा
चांदवड, ता. १२ : कर्जमाफीचा लाभ मिळूनही नव्या पीक कर्जासाठी ‘एनपीए’चे कारण सांगून कर्ज नाकारले जात असल्याची तक्रार मनमाड येथील युनियन बँक शाखेतील शेतकऱ्यांनी केली आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतीसाठी भांडवलाची गरज असताना कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
चंद्रभान निवृत्ती उगले व अन्य काही शेतकऱ्यांचे उदाहरण प्रतिनिधीक ठराव्यात अशाच आहेत. बँकेच्या मनमाड शाखेत पीक कर्ज खाते होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत संबंधित शेतकरी पात्र ठरले. थकीत कर्जाचा योजनेत समावेश होऊन कर्जमाफीचा लाभ मिळाला.
कर्जमाफीनंतर नव्या हंगामासाठी पीक कर्जाची गरज असल्याने संबंधित शेतकरी पुन्हा बँकेत गेले. मात्र, ‘तुमचे खाते एनपीए झाले आहे. त्यामुळे पीक कर्ज मिळणार नाही,’ असे बँक अधिकाऱ्यांनी सांगितल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळूनही नव्या पीक कर्जाचा मार्ग मोकळा होत नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.
शासनाने कर्जमाफीच्या माध्यमातून थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. योजनेनुसार पात्र पीक कर्जाची ठराविक मर्यादेपर्यंतची थकबाकी कर्जमुक्त करण्याची तरतूद आहे. तसेच शेतकऱ्यांना अल्पमुदतीचे पीक कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी बँकांना व्याज सवलतीची व्यवस्था आहे. राष्ट्रीयीकृत बँकांचाही त्यात समावेश आहे. मात्र, कर्जमाफीचा लाभ मिळाल्यानंतर जुन्या एनपीएचा आधार घेत नव्या पीक कर्जाचा अर्ज नाकारता येतो का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चांदवड परिसरात यंदा पावसाचे प्रमाण असमान राहिल्याने खरीप हंगाम अडचणीत आला आहे. बियाणे, खते, औषधे, मशागत आणि मजुरीसाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज आहे. बँकेकडून कर्ज मिळत नसेल तर सावकाराकडे जावे का, खासगी कर्ज घ्यावे का, असा सवाल संबंधित शेतकरी करीत आहेत. कर्जमाफीमुळे जुना कर्जबोजा हलका झाला. मात्र, शेती सुरू ठेवण्यासाठी नव्या भांडवलाची गरज कायम आहे. त्यामुळे ‘कर्जमाफी झाली, पण पीक कर्ज मिळत नसेल तर त्याचा प्रत्यक्ष फायदा काय?’ असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.
बँकेच्या भूमिकेकडे लक्ष
या प्रकरणी युनियन बँकेच्या मनमाड शाखेची अधिकृत भूमिका महत्त्वाची आहे. संबंधित शेतकऱ्यांचे कर्जमाफी खाते कोणत्या स्थितीत आहे, कर्जमाफीची रक्कम खात्यात समायोजित झाली आहे का, नवीन पीक कर्जासाठी अर्जाची प्रक्रिया काय आहे आणि ‘एनपीए’च्या कारणामुळे अर्ज नाकारण्याबाबत बँकेचे नियम काय आहेत, याची स्पष्टता होणे आवश्यक आहे.
कर्जमाफीच्या यादीत नाव असून लाभही मिळाला; तरी पीक कर्जाला ‘एनपीए’चा अडसर असेल तर दुष्काळात शेतीचा खर्च भागवायचा कसा, हा प्रश्न आहे. याकडे प्रशासन आणि बँकिंग यंत्रणेने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
‘कर्जमाफी झाली आहे. आता शेतीसाठी पीक कर्जाची गरज आहे. मात्र, बँकेत गेल्यावर एनपीए झाल्यामुळे कर्ज मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. कर्जमाफीचा लाभ मिळूनही नवीन कर्ज मिळत नसेल तर शेतीचा खर्च भागवायचा कसा? दुष्काळी परिस्थितीत सावकाराकडून कर्ज घेण्याशिवाय आमच्यासमोर पर्याय काय?’
— चंद्रभान निवृत्ती उगले, शेतकरी, निमोण, ता. चांदवड
या प्रकरणी युनियन बँकेच्या मनमाड शाखेतील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, फोन उचलल्यानंतर अधिकाऱ्यांनी तो कट केल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा कर्ज अर्ज नेमक्या कोणत्या कारणामुळे नाकारला, तसेच कर्जमाफी झालेल्या खातेदारांना नवीन पीक कर्ज देण्याबाबत बँकेची भूमिका काय आहे, हे स्पष्ट होऊ शकले नाही.