नाशिक - ‘टूबीएचके, थ्रीबीएचके फ्लॅटला ताजमहल म्हणून फसू नको, दहा पाच गुंठ्याचं अंगण आहे, तुझ्या बापाच्या घराला, तू मात्र खुराड्यात जाऊन बसू नको’. या कवितेच्या ओळी आहेत दिंडोरी तालुक्यातील चिंचखेडचे कवी प्रा. संदीप जगताप यांच्या. शेतकरी कुटुंबातील मुलांशी विवाह करा, असे मुलींना आवाहन करणारी ही कविता वाचून जुन्नर तालुक्यातील एका मुलीने शेतकरी मुलाशी लग्न करण्यास होकार दिला आहे. ‘शेतकरी नवरा नको ग बाई’ म्हणणाऱ्यांच्या सध्याच्या जगात हा आशेचा एक किरण परिवर्तनाची नांदी ठरू शकतो.
‘मोबाईलवरच्या ॲनिमेटेड पावसात कधीच कोणी भिजत नाही, शहरामधल्या पाचव्या मजल्यावर कुठलंच सुख रुजत नाही. रुजायच असल, भिजायच असल तर हवी असते माती अन् वरून खऱ्या खुऱ्या पावसाची सर, आयुष्य करायचं असलं हिरवगार तर पोरी, शेतकरी पोराशी लग्न कर..!’ असे म्हणत कवी जगताप यांनी शेतीचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व मुलींना पटवून दिले आहे. ही कविता ऐकून आणि वाचून शेतकऱ्यांची मुले त्यांच्या काळजातील व्यथा मांडल्याचे सांगत भावनांना वाट मोकळी करून देत आहेत.
कवितेच्या प्रत्येक शब्दात शेतकरी राजाचे वर्णन करत जगताप शेतकऱ्याला कधीच नसतं पेन्शनचं टेन्शन कारण माती कधीच रिटायर होत नाही, पायलीभर पेरले की वर्षभराचे उगवून देते काळी आई’ हा दुर्दम्य आशावादही जागवितात. आज प्रत्येक गावात किमान ३० ते ५० मुलांचे लग्नाचे वय उलटले आहे. मुलींची संख्या कमी आहे हे त्याचे कारण नाही तर त्यांची मानसिकता शेतकरी मुलांबाबत सकारात्मक नाही. यापार्श्वभूमीवर भविष्यात शेतीचे महत्व वाढणार असल्याचा संदेश कवी प्रा. जगताप यांनी या कवितेतून दिला आहे.
मधल्या काळामध्ये शेतीमध्ये सरकारच्या धोरणांनी जी वाताहात झाली. त्यामुळे शेतीबद्दल नकारात्मक दृष्टिकोन तयार झाला. त्याचा दुष्परिणाम आज प्रामाणिकपणे शेतामध्ये कष्ट करणारी मुले भोगत आहे. पण, हा काळ संपणार आणि पुन्हा शेतीचेच दिवस येणार, हे सत्य आहे. म्हणून मुलींना आवाहन करणारी कविता मी लिहिली.
- प्रा. संदीप जगताप, कवी, चिंचखेड (जि.नाशिक)
कवी प्रा. संदीप जगताप यांची ‘आयुष्य करायचं असेल हिरवंगार तर पोरी शेतकरी पोराशी लग्न कर’ ही कविता मी ऐकली. त्यातून शेतीचे महत्त्व पटले. यामुळेच जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
- दामिनी, जुन्नर, शेतकरी नवरा स्वीकारणारी मुली (नाव बदललेले आहे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.