ऊसाची थकती रक्कम तत्काळ द्यावी
शेतकऱ्यांचा ‘स्पायका’ शुगरविरोधात उपोषणाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
साक्री, ता. ३१ : ‘स्पायका’ शुगरचे प्रमुख बबनराव गायकवाड यांच्याकडे गेल्या ११ महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या ऊसबिलाची रक्कम थकीत केल्याने साक्री येथील शेतकरी प्रतिनिधी धनंजय अहिरराव २ नोव्हेंबरपासून तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह बेमुदत उपोषणास बसणार आहेत.
शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, वारंवार आश्वासने देऊनही त्यांना अद्याप हक्काचे पैसे मिळालेले नाहीत. गेल्या ११ महिन्यात श्री. गायकवाड यांनी ५ ते ७ वेळेस लेखी आश्वासन देऊन वेळकाढू धोरण अवलंबले आहे. या प्रकरणात श्री. गायकवाड प्रचंड फसवणूक करीत असून, प्रचंड दुष्काळाचे सावट असताना देखील थकीत रक्कम दिली जात नसल्याने म्हटले आहे. १ ऑक्टोबर २०२६ ला बबनराव गायकवाड यांनी मालेगाव तहसीलदारांना दिलेल्या पत्रात ३० दिवसांत पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, १२ ऑक्टोबर २०२६ ला प्रादेशिक सहसंचालक (साखर), अहिल्यानगर यांना दिलेल्या पत्रात ६० दिवसांची मुदत नमूद केली आहे. या परस्परविरोधी आश्वासनांमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या अन्यायाविरोधात शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि प्रशासनाचे लक्ष वेधले जावे, यासाठी धनंजय २ नोव्हेंबरपासून साक्री तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह उपोषणास बसणार आहेत.
------
आम्ही रावळगाव साखर कारखान्याला ऊस देऊन अनेक महिने झाले. मात्र, अद्याप आमच्या घामाचे आणि कष्टाचे पैसे मिळालेले नाहीत. ऊस बिल थकल्यामुळे शेतीचा पुढील हंगाम, मुलांचे शिक्षण आणि कौटुंबिक खर्च भागवणे कठीण झाले आहे. कारखाना व्यवस्थापनाने तातडीने आमची थकीत ऊस बिले अदा करावीत.
- लिंकेश अहिरराव, डांगगशीरवाडे
------
शेतकऱ्यांनी कारखान्यावर विश्वास ठेवून ऊस दिला. मग, शेतकऱ्यांचे पैसे देण्याची जबाबदारी कारखाना व्यवस्थापनाची नाही का? वारंवार मागणी करूनही न्याय मिळत नसल्याने आता आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही. धनंजय अहिरराव यांनी शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी सुरू केलेल्या उपोषणाला आमचा ठाम पाठिंबा आहे.
- वैभव सोनवणे, शेतकरी, मालपूर