कंपन्यांचे कंत्राट मिळून
देण्याचे आमीष देत गंडा
-------
पिता-पुत्राकडून अठरा लाखांत फसवणूक
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २५ : वेगवेगळ्या कंपन्यांची निविदा(कंत्राट) मिळवून देण्याचे अमिष दाखवून मिलिंद विलास मंडाडुळे (वय ४६, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांची १८ लाख रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. हा प्रकार १५ जानेवारी २०२५ ते २४ ऑक्टोबर २०२६ या काळात तालुक्यातील नशिराबाद येथे घडला. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात प्रवीण भास्कर भामरे (वय ६०, रा. नशिराबाद, ह.मु. धुळे) व आशितोष प्रवीण भामरे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील मिलिंद मंडाडुळे यांची वाहने मालवाहतुकीसाठी नशिराबाद येथील सिमेंट कंपनीत लावलेली आहेत. तेथे त्यांची प्रवीण भामरे व आशितोष भामरे या दोघांशी ओळख झाली. त्यानंतर त्यांनी मंडाडुळे यांना विविध साखर, कांदा कारखाने येथे परिचय असून, कंपन्यांच्या निविदा(टेंडर) घेत असल्याचे सांगितले. तुम्हालाही निविदा (टेंडर) मिळवून देतो, असे अमिष दाखविले. त्यासाठी दोघांनी त्यांच्याकडून वेळोवेळी रोख व ऑनलाईन एकूण १८ लाख रुपये घेतले. मात्र, निविदा (टेंडर) मिळाली नाही व पैसे परत देण्याची वेळ आली, त्यावेळी दोघे जण नशिराबाद येथून पसार झाले.
कंपनीत चौकशीतून उलगडा
पैसे परत मिळत नसल्याने मंडाडुळे यांनी सिमेंट कंपनीत जाऊन चौकशी केली असता, भामरे यांचे कंपनीमध्ये कोणतीही निविदा(टेंडर) नसल्याचे समोर आले. याप्रकरणी मिलिंद मंडाडुळे यांनी २४ ऑगस्टला नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून प्रवीण भामरे व आशितोष भामरे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक प्रिया दातीर करीत आहेत.
----पुर्ण